पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एवढं गोंधळलेलं सरकार मी पाहिलं नाहीः देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती शब्दांत टीका केली. या सरकारला अद्यापही सूर गवसलेला नाही. आतापर्यंतचे सर्वांत गोंधळलेले सरकार असल्याचे त्यांनी म्हटले. अधिवेशना आधी विरोधकांबरोबर सुसंवाद व्हावा यासाठी चहापानाचे आयोजन केले जाते. मात्र या सरकारमध्ये कुठलाच समन्वय नाही. त्यामुळे त्यांनीच आधी चहापान घ्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला. 

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन फडणवीस यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, या सरकारने दिलेले कोणतेच आश्वासन पाळलेले नाही. प्रत्येक गोष्टींपासून घुमजाव करणे सुरु आहे. शेतकरी कर्जमाफीबद्दल दिशाभूल करणे सुरु आहे. ज्या गोष्टींबद्दल आम्हाला नावे ठेवली. आता तीच पद्धत सरकार अवलंबत आहे. 

कर्जमाफीही नाही आणि मुक्तीही नाही. जाहीरनाम्यातील एकही आश्वासन पूर्ण नाही. शेतकऱ्यांची तूर खरेदीही व्यवस्थित नाही. या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यांचा पर्दाफाश आम्ही करु. महिलांवर अत्याचार होत आहेत. सरकारकडे संवेदनशीलताच दिसत नाही.

पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कामांना स्थगित दिली जात आहे. हे स्थगिती सरकार आहे. गावोगावी हीच चर्चा आता सुरु आहे. 

मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
दोन गोष्टींबद्दल मी मुख्यमंत्र्यांची अभिनंदन करतो. एल्गार परिषदेचा तपास त्यांनी एनआयएकडे दिला आणि सीएए-एनआरसीबद्दल त्यांनी जी भूमिका घेतली त्याचे स्वागत आहे. 

यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणारे एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांचाही समाचार घेतला. हिंदू सहिष्णू आहेत म्हणूनच तुम्हाला हे बोलता आल्याचे ते म्हणाले.

फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे..

- जलयुक्त शिवार असो की वृक्षारोपण आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही. जाणीवपूर्वक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न. सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय उत्तम काम केले, मी त्यांचे अभिनंदन करतो.

 

- स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. 'शिदोरी' मासिकावर कारवाई करावीच लागेल. इंदिराजींबाबत १० मिनिटात माफी मागणारे सावरकरांबाबत मौन का?

 

- भीमा कोरेगाव आणि एल्गार हे वेगळे नाही, हेच आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. तपासाची व्याप्ती आता वाढली असल्याने तो केंद्र सरकारकडे जाणेच योग्य

 

- १९९९ पासून ते २०१९ पर्यंतच्या आर्थिक स्थितीवर सर्व निकष दाखवीत श्वेतपत्रिका नक्की काढली पाहिजे. खरे चित्र जनतेपुढे येईल

 

- राम मंदिरासाठी ट्रस्ट तयार करावा, हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. मुस्लिम समाजाचे सर्व स्थळ हे वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येतात, हेही त्यांना ठावूक आहे. तेथे ट्रस्ट नसतो. सध्या मुस्लिम मतांसाठी देशात स्पर्धा सुरू आहे.

 

- थेट निवडणूक असली की सरकारचा हस्तक्षेप कमी असतो. त्यामुळेच त्या रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. सरपंच निवडणूक थेट घेण्याचा निर्णय आम्ही सुद्धा सरपंच परिषदेच्या शिफारसीवर घेतला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lop devendra fadnavis slams on maha vikas aghadhi thackeray government budgetary session