पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसभा निवडणूक २०१९ : राज्यातील सर्वांत श्रीमंत उमेदवार माहितीये?

खासदार उदयनराजे भोसले

आपल्या हटके अंदाजामुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले राज्यातील सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. उदयनराजे भोसले साताऱ्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये उदयनराजे भोसले यांनी त्यांच्याकडे १९९ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले आहे.  

उदयनराजे भोसले यांच्याकडे एकूण १८५.७० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर १३.३८ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे. त्यांच्यावर एकूण १.२३ कोटी रुपयांचे कर्जही असल्याचे त्यांनी लिहिले आहे. आपल्या कुटुंबाकडे एकूण ८९ लाख रुपयांची रोकड असून, १.४५ कोटी रुपये वेगवेगळ्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतविले असल्याचेही त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे. उदयनराजे भोसले यांची पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी १० लाख रुपयांचे बिटकॉईन्स खरेदी केले होते. पण त्याचे सध्याचे मूल्य ४ लाख रुपये असल्याचे त्यांनी लिहिले आहे. 

उदयनराजे भोसले यांनी स्थानिक हजारो लोकांना ८.१६ कोटी रुपयांची वैयक्तिक कर्जेही दिली आहेत. त्याचबरोबर त्यांनी ३५.६९ लाख रुपयांचे कर्ज कुटुंबाकडून घेतले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

उदयनराजे भोसले यांच्याकडे एकूण पाच कार आहेत. ज्यामध्ये मर्सिडिज बेंझ, फोर्ड एंडेव्हर, ऑडी, मारुती जिप्सी आणि फोक्सवॅगन पोलो यांचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबाकडे १.९० कोटी रुपयांचे सोन्याचे दागिनेही आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीत २३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.