पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजू शेट्टींना 'ते' वक्तव्य भोवले, आचारसंहिता भंगाचा गुन्हा

राजू शेट्टी

निवडणूक प्रचारावेळी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपावरून खासदार आणि हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार राजू शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलिसांनी ही कारवाई केली. हातकणंगले मतदारसंघातील हेर्ले गावात प्रचारसभेवेळी राजू शेट्टी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रचारसभेत राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांची मुले देशासाठी सैन्यात भरती होत असताना, देशपांडे, कुलकर्णी ही मंडळी केवळ देशभक्तीच्या गप्पा मारत आहेत. ब्राह्मण समाजाला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने राजू शेट्टी यांनी हे वक्तव्य केले. त्यावरून त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आले. कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी गेल्या शुक्रवारी शेट्टी यांना नोटीस पाठवली आणि त्यांच्याकडून खुलासा मागविला. खुलासा करण्यासाठी त्यांना शनिवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. शनिवारी संध्याकाळी पत्रकारांशी संवाद साधताना शेट्टी यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. युद्धभूमीवर लढताना जे जवान शहीद झाले. त्यांना न्याय मिळवून देण्याचा माझा उद्देश होता. माझ्या बोलण्याचा कुणीही चुकीचा अर्थ काढू नये. जर कोणी माझ्या वक्तव्यामुळे दुखवला असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. 

कोल्हापूर पोलिसांच्या अंतर्गत येणाऱ्या हातकणंगले पोलिस ठाण्यात शेट्टी यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १८८ आणि १२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातकणंगले पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम दुब्बल या प्रकरणी तपास करीत आहेत.

निवडणूक आयोगाच्या पथकाने या प्रकरणी दिलेल्या सूचनेनुसार पोलिसांनी शेट्टींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.