पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एक्झिट पोलनुसार 'ती' अन्य जागा कुणाकडे

मतदानासाठी रांगेत उभारलेले नागरिक (संग्रहित छायाचित्र)

लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि अखेरचा टप्पा रविवारी संपुष्टात आला. राजकीय पक्षांसह सर्वांनाच आता निकालाची आतुरता लागली आहे. तत्पूर्वी, एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार यंदाही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच सत्तेवर येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही यावेळी युतीच्या जागा जरी कमी होणार असल्या तरी त्यांचेच पारडे जड असल्याचे बहुतांश सर्वेक्षणात दिसून आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यंदा बऱ्यापैकी यश मिळताना दिसत आहे. परंतु, काही सर्वेक्षणात राज्यातील ४८ पैकी १ जागा ही अन्यला दाखवण्यात आली आहे. ही एक जागा कोणती याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्या एका जागेची चर्चा होत आहे, त्यामध्ये हातकणंगले, सोलापूर, सांगली आणि अमरावती लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या चारही मतदारसंघातील उमेदवार हे मातब्बर आहेत. त्यामुळे उर्वरित ४७ मतदारसंघापेक्षा या एका मतदारसंघाकडेच सर्वांचे लक्ष आहे. 

Lok Sabha election 2019 : एक्झिट पोलचे अंदाज चुकीचेही ठरलेत, पाहा भूतकाळात काय घडलं

सोलापूरः प्रकाश आंबेडकरांमुळे काँग्रेस-भाजप अस्वस्थ..
राज्याचे मुख्यमंत्रीपद, केंद्रातील ऊर्जामंत्री, गृहमंत्री तसेच राज्यपाल पद भुषवणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर मतदारसंघातून निवडणुकीस उभे आहेत. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी एकतर्फी वाटणारी येथील लढत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी झाली. मावळत्या लोकसभेतील सोलापूरचे भाजपचे खासदार शरद बनसोडे यांची कामगिरी यथातथाच राहिल्याने भाजपला आपला उमेदवार बदलावा लागला होता. भाजपने येथून नवखे जयसिद्धेश्वर महाराज यांना उमेदवारी दिली. पण जेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर येथून उमेदवारी दाखल केली. तेव्हा एकतर्फी वाटणारी निवडणूक तिरंगी झाली. या मतदारसंघात दलित समाजाचे मतदान तीन ते साडेतीन लाख आहे. त्याचबरोबर मुस्लीम आणि धनगर समाज आपल्याबरोबर असल्याचा दावा वंचित आघाडीने केला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. त्यामुळे सोलापुरात शिंदे आणि जयसिद्धेश्वर महाराज की आंबेडकर हा मोठा प्रश्न आहे. 

Lok Sabha election 2019 Exit Poll: बहुतांश एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा 'नमो-नमो'

हातकणंगलेः चळवळीतल्या कार्यकर्त्याचा कस
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक विद्यमान राजू शेट्टी हॅटट्रिक करणार की शिवसेनेचे धैर्यशील माने बाजी मारणार याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. राजू शेट्टी या मतदार संघातून दोन वेळा खासदार झाले. राजू शेट्टी यांनी वारंवार ऊस आणि दूधाला चांगली किंमत मिळावी यासाठी लढा दिला. या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवल्यामुळे शेतकरी त्यांच्यासोबत आहे. पण ऐन निवडणुकीवेळी ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ते अडचणीत आले होते. त्याचा फटका यावेळी त्यांना बसतो का ते पाहावे लागेल. पण या मतदारसंघात शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. शेट्टींविरोधात शिवसेनेकडून धैर्यशील माने तर वंचित बहूजन आघाडीकडून असलम बादशाहजी सय्यद उभे आहेत. ऊसदर, दूधदर यासाठी केलेले आक्रमक आंदोलन, भाजपविरोधात घेतलेली भूमिका यामुळे शेट्टी चर्चेत होते. यावेळी सेनेचे पारडे जरा जड मानले जाते. माने हे शेट्टींसमोर नवखे असले तरी त्यांचे वक्तृत्व प्रभावी आहे. या मतदारसंघातील सहापैकी ५ आमदार हे युतीचे आहेत, ही त्याचा जमेची बाजू आहे. त्यामुळे या मतदारसंघाबाबतही काही सांगता येत नाही.

Maharashtra Exit Poll : राज्यात पुन्हा एकदा युतीच वरचढ ठरण्याचा अंदाज

सांगलीः वंचित आघाडीचा 'पडळकर फॅक्टर' 
वसंतदादांचे घराणे की भाजपचे संजयकाका की वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर सांगली लोकसभा मतदारसंघात बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. भाजपचे संजयकाका पाटील दुसऱ्यांदा निवडून येण्याच्या तयारीत आहेत. उमेदवारी अर्ज भरायच्या काही दिवस आधी काँग्रेसमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत येऊन उमेदवारी मिळवणारे दादा घराण्याचे विशाल पाटील यांनाही विजयाचा विश्वास आहे. उत्कृष्ट वक्तृत्व असलेले पूर्वाश्रमीचे भाजपचे आणि वंचित आघाडीकडून उभे असलेले पडळकर यांनी या दोन्ही मातब्बरांसमोर मोठे आव्हान उभे केल्याचे बोलले जाते. धनगर समाजाचे मोठे मतदान असलेल्या या मतदारसंघात इतर समाजातील मतदान आपल्यालाच पडावे यासाठी तिन्ही उमेदवारांना भरपूर प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. आटपाडीसारख्या दुष्काळी भागातील गोपीचंद पडळकर हे राष्ट्रीय समाज पक्षातून भाजपमध्ये आले होते. निवडणूक प्रचारावेळी त्यांची स्टार प्रचारकात गणती होती. वंचित आघाडीचा 'पडळकर फॅक्टर' चालल्यास दिग्गजांना तो मोठा धक्का असू शकतो. 

अमरावतीः अडसूळ की कौर
शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ आणि युवा स्वाभिमानी पार्टीच्या नवनीत कौर राणा यांच्यात प्रमुख लढत होत आहे. नवनीत कौर या आमदार रवी राणा यांच्या पत्नी आहेत. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पाठिंबा दिला आहे. तर अडसूळ हे आतापर्यंत ५ वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. यावेळी अडसूळ यांच्याविरोधात स्थानिक शिवसैनिकांनी बंड पुकारले होते. त्याचबरोबर त्यांच्याबद्दल नाराजीही असल्याचे सांगण्यात येत होते. त्याचे नकारात्मक मतात परिवर्तन झाल्यास अ़डसुळांना धक्का बसू शकतो. नवनीत कौर राणा या गतवेळी राष्ट्रवादीकडून लढल्या होत्या. त्यावेळी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची ३ लाख २९ हजार २८० मते प्राप्त केली होती. यंदा मतदारांमध्ये त्यांच्या उमेदवारीबद्दल आकर्षण आहे. त्यांचे वक्तृत्वही प्रभावशाली आहे. त्याची मतदारांवर छाप पडते. अडसुळांबद्दलच्या नाराजीचा फटका सेनेला बसल्यास नवनीत कौर राणा यांना याचा फायदा होऊ शकतो असेही बोलले जात आहे. 

त्यामुळे या मतदारसंघापैकी एक्झिट पोलनुसार कोणती जागा 'अन्य'ला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- दिग्विजय जिरगे

digvijay.jirage@htdigital.in