पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... आणि लोकसभा निवडणुकीत युतीच्या यशाचे शिलेदार ठरले देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीने ४१ जागा जिंकत पुन्हा एकदा राज्यातील आपला दबदबा सिद्ध केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मनसुबे उधळून लावत भाजपने राज्यात २३ मतदारसंघात तर शिवसेनेने १८ मतदारसंघात यश मिळवले. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून विजयाचा दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

राज्यात दुष्काळ, शेतकऱ्यांमधील रोष, मराठा आरक्षण, दलितांचे प्रश्न असे अनेक ज्वलंत विषय असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्टपणे राजकीय चाली खेळत विरोधी पक्षाला निष्प्रभ केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने असलेली सुप्त लाट याच्या जोडीला देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले अपार कष्ट, योग्यवेळी शिवसेनेशी केलेली युती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात दिलेले तुल्यबळ उमेदवार आणि लोकांचा रोष असलेल्या उमेदवारांची कापलेली तिकिटे यामुळे भाजप-शिवसेना युतीचा विजय सुकर झाला, असे राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी म्हटले आहे.

हा कौल आनंद देणारा तसेच झोप उडवणारा- मुख्यमंत्री

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात अस्तित्त्वात आलेली वंचित बहुजन आघाडीही या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरली. या आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांचे विभाजन झाले. निकालांचे विश्लेषण केल्यास एकूण सात ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमुळे विरोधी पक्षाला फटका बसला. यामध्ये दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाचाही समावेश आहे.

या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेशी केलेली निवडणूकपूर्व युती अत्यंत महत्त्वाची ठरली. २०१४ मध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळे झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद कायम ठेवला होता. त्याचा उपयोग पुन्हा युती होण्यात झाला. युती झाल्यानंतरही प्रत्येक मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करतील, याकडेही देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष दिले. उदाहरणच द्यायचे झाले तर मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार यांचा शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी केलेला पराभव. अजित पवार यांनी आपला मुलगा पार्थसाठी या मतदारसंघात मोठी मेहनत घेतली. पण त्याला यश आले नाही. पार्थ पवार याचा श्रीरंग बारणे यांनी पराभव केला. 

उमेदवारांची निवड हा सुद्धा भाजपच्या यशासाठी कळीचा मुद्दा ठरला. नांदेड आणि बारामती या अनुक्रमे अशोक चव्हाण आणि पवार कुटुंबिय यांच्या बालेकिल्ल्यात मजबूत उमेदवार देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यामुळे अशोक चव्हाण आणि सुप्रिया सुळे यांना आपल्या मतदारसंघामध्येच जास्त काळ थांबून राहणे गरजेचे झाले. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचा प्रताप पाटील चिखलीकर यांनी पराभव केला. तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी कांचन कुल यांचा पराभव केला.

लोकसभेचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही - शरद पवार

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात घेतलेल्या तब्बल ९६ जाहीर सभा याचाही फायदा भाजपला झाला. त्याचबरोबर राजकीय वारसा असलेल्या उमेदवारांना भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा त्यांचा निर्णयही यशस्वी ठरला. यामध्ये नगरमधून सुजय विखे-पाटील तर माढामधून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोघेही भाजपच्या तिकिटावर यशस्वी ठरले. 

भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, शेतकऱ्यांचे आणि मराठा समाजाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे हाताळले. त्यामुळे त्यांच्या रोषाचा भाजपला फटका बसला नाही. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यातील बहुतांश मागण्या मान्य केल्यामुळे त्यांनाही सरकारविरुद्ध फारसे काही करता आले नाही.

महाराष्ट्रातील दुष्काळाचा निवडणुकीत भाजपला फटका बसेल का, अशी चिंता होती. पण तोही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उत्तमरित्या हाताळल्याचे याच नेत्याने सांगितले. त्यांनी तालुकापातळीवर पाण्याची स्थिती काय आहे, याचा आढावा घेतला. त्याचबरोबर दुष्काळग्रस्त भागातील ६२ लाख शेतकऱ्यांना निवडणुकीच्या आधीच सरकारी आर्थिक मदत पोहोचेल, याचीही काळजी घेतली गेली, असे या नेत्याने सांगितले. केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे ६००० रुपयांची आर्थिक मदतीतील पहिला हफ्ता शेतकऱ्यांना निवडणुकीआधीच मिळाला होता. त्याचाही भाजपला फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले.