येत्या २३ मे रोजी जाहीर होणारे लोकसभा निवडणुकीचे निकाल हे केवळ लोकसभेपुरता मर्यादित नाही. तर राज्यात वारं नक्की कोणत्या दिशेने वाहते आहे, हे सुद्धा या निकालांवरून स्पष्ट होईल. विधानसभेची निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर आली असल्यामुळे राज्यात कोणाचे पारडे जड आहे, हे सुद्धा या निकालांवरून स्पष्ट होणार आहे. भाजप-शिवसेना युती की काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी कोणाची स्थिती जास्त भक्कम आहे, हे या निकालांवरून दिसेल.
२३ मे रोजी निकाल जाहीर होणार असले, तरी साधारणपणे स्थिती काय राहिल, याची तीन शक्यतांमध्ये विभागणी करता येईल.
पहिली शक्यता म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीसारखेच यावेळी भाजप-शिवसेना हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा सर्वाधिक जागा जिंकतील. गेल्यावेळी ४२ जागांवर या दोन्ही पक्षांनी मिळून विजय मिळवला होता. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला अवघ्या ६ जागांवर विजय मिळवता आला होता.
वंचित बहुजन आघाडीमुळे महायुतीलाच फायदा: रामदास आठवले
'फिर एक बार मोदी सरकार', या भाजपच्या घोषणेला जर लोकांनी मनापासून प्रतिसाद दिला, तर पुन्हा एकदा केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे. या स्थितीत राज्यात युतीला ४० पेक्षा जास्त जागा मिळू शकतात. जर तसे घडले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठे बळ मिळेल. त्याचबरोबर राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीचे सरकार येण्याची शक्यता जास्त असल्याचे दिसून येईल. या स्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती आणखीनच बिकट होईल. कारण वाऱ्याचा अंदाज आल्यामुळे या दोन्ही पक्षातील काही नेते भाजप-शिवसेनेच्या मंडपात जाऊ शकतात.
दुसरी शक्यता म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला युतीपेक्षा जास्त जागा मिळतील. आघाडीला ३० पेक्षा जास्त जागा मिळू शकतात. जर केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात खरंच लोकांमध्ये नाराजी असेल, तर असे होण्याची शक्यता जास्त आहे. असे घडले तर तो राज्याच्या राजकारणातील टर्निंग पॉईंट ठरेल. त्याचबरोबर राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारसाठी ती धोक्याची घंटा असेल. सध्या आघाडीतील अनेक नेते महाराष्ट्रात आमचे ३० खासदार निवडून येतील, असे सांगत आहेत.
सरकारला फसवायचंच होतं, मराठा आरक्षणावरुन राज ठाकरेंची टीका
तिसरी शक्यता म्हणजे दोन्ही पक्षांना जवळपास एकसारख्या जागा मिळणे. युतीला २५ ते ३० जागा तर आघाडीला २० ते २५ जागा मिळण्याची शक्यता असू शकते. या स्थितीत युतीच्या जागा कमी झाल्यामुळे आघाडीची ताकद राज्यात वाढू शकते. पण असे निकाल आल्यास महाराष्ट्रातील सत्ता मिळवण्यासाठी दोन्हींमध्ये कांटे की टक्कर राहणार, असाच अर्थ काढता येईल.
२३ मेच्या निकालांचे विश्लेषण करताना आणखी एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभांचा आणि वंचित बहुजन आघाडी या नव्या आघाडीचा निकालांवर परिणाम काय झाला. त्याचा मतदानावर प्रभाव पडला का, हे सुद्धा यातून दिसणार आहे.