पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मान्सून यंदा महाराष्ट्रावर नाराज राहण्याचा अंदाज

यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून यंदा नेहमीपेक्षा उशीराने महाराष्ट्रात दाखल होईल. त्याचबरोबर सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यामध्ये अर्थात पूर्ण जून महिना आणि जुलैच्या पूर्वार्धात कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. या अंदाजामुळे आधीच उन्हाचा कडाका सहन करीत असलेल्या मराठी माणसावर चिंतेचे आणखी एक सावट पसरल्याचे दिसते आहे. संपूर्ण देशभरातच यंदा दीर्घकालीन सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.

मुंबईमध्ये सर्वसाधारणपणे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात मान्सूनचे आगमन होते. पण यावेळी जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात मान्सून मुंबईमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत पाऊस जोरदार बरसतो. पण यावेळी सलग मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. अधूनमधून जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे, असे स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पालावत यांनी सांगितले. 

नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी साधारणपणे १ जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर पुढच्या सहा ते आठ दिवसांमध्ये तो दक्षिण महाराष्ट्रात येऊन पोहोचतो. स्कायमेटने जारी केलेल्या अंदाजानुसार संपूर्ण जून महिना आणि जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या इतर काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज आहे. मराठवाड्यात सध्याही तीव्र दुष्काळ आहे. येत्या वर्षभरातही त्यामध्ये फारसा बदल होईल, असे वाटत नसल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असे वाटत नाही. काही ठिकाणी सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

मार्च ते मे या कालावधीमध्ये एल निनोच्या ८० टक्के प्रभावामुळे देशात यंदा दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधिकृतपणे एल निनोच्या प्रभावाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. पण त्याचा प्रभाव यंदाच्या नक्कीच राहील, असे स्कायमेटने म्हटले आहे.