पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोल्हापूर, सांगलीमध्ये परिस्थिती अजून बिघडली, पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत

पुणे-बंगळुरू महामार्गावर कोल्हापूरनजीक वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने आणि अद्याप कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर असल्याने या ठिकाणची परिस्थिती अजून बिघडली आहे. या दोन्ही जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही शहरांना वेगवेगळ्या मार्गांनी जोडणारे रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे काही अंशी शहरांचा संपर्कही तुटला आहे. विशेष म्हणजे पुणे ते बंगळुरू महामार्गावरही काही ठिकाणी पुलावर पाणी आल्याने हा मार्गही मंगळवारी सकाळी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

कलम ३७० : अमित शहा यांना कोणाची मदत होती माहितीये?

कोल्हापूरमध्ये अनेक भागांत पाणी
कोल्हापूरमध्ये पंचगंगेची पाणी पातळी ५१ मीटरपर्यंत जाऊन पोहोचली आहे. यामुळे शहराच्या व्हिनस कॉर्नर, खानविलकर पेट्रोल पंप, शाहूपुरी कुंभार गल्ली, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर यासह इतर भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे. काल रात्री या भागात साचलेल्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या केंद्रात पाणी शिरल्याने शहराला मंगळवारी पाणी पुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने सांगितले. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

राधानगरी धरणाचे आपातकालीन दरवाजे उघडले
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगर धरणाचे आपातकालीन दरवाजेही यंदा सततच्या पावसामुळे उघडावे लागले आहेत. खूप कमी वेळा आपातकालीन दरवाजे उघडण्याची वेळ येते. यंदा आपातकालीन दरवाजे उघडून त्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातही पाणी शिरल्याची माहिती मिळाली आहे. 

कोल्हापूरचे प्रवेश मार्ग बंद
कोल्हापूर शहरात प्रवेश करण्यासाठी विविध ठिकाणावरून येणारे प्रवेश मार्गच बंद झाले आहेत. गगनबावडा, पन्हाळा या मार्गावरून शहरात येणारी वाहतूक अद्याप ठप्पच आहे. पुणे ते बंगळुरू मार्गावरही किनी टोलनाक्यापुढे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. 

...म्हणून अक्षयला 'मिशन मंगल'च्या पोस्टरमध्ये सर्वाधिक प्रसिद्धी

सांगलीत पाणीच पाणी
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आणि नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शहराच्या अनेक भागात पाणी साचले आहे. सांगलीतील शिवाजी मंडईचा परिसर पाण्याखाली गेला आहे. सांगलीहून पुण्याला येण्यासाठी इस्लामपूर मार्गाचा वापर केला जातो. पण पुलाजवळ पाणी आल्याने इस्लामपूर मार्गे पुण्याकडे येणारी वाहतूकही ठप्प झाली आहे. सांगली ते कोल्हापूर हा मार्गही पाण्यामुळे बंद झाला आहे. सांगलीमध्ये एसटीच्या ६०० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील २१ पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे.