पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोल्हापूरमधील पूरस्थिती अद्याप गंभीर, नागरिकांचे हाल

कोल्हापूर महापूर

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये येणाऱ्या पावसाच्या पाण्यात वाढ झाल्यामुळे राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे पुन्हा एकदा उघडले गेले आहेत. या धरणातून पंचगंगा नदीत विसर्ग होतो आहे. एकीकडे कोल्हापूर शहरातील पूरस्थिती गंभीर झाली असताना, दुसरीकडे राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडल्यामुळे पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमधील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत.

पुण्यात खडकवासला धरणातील विसर्ग वाढविला

कोल्हापूरमध्ये गेल्या चार दिवसांपासून पूरस्थिती आहे. शहराच्या अनेक भागात पाणी साचले आहे. तर जिल्ह्यातील काही गावांनाही पाण्याचा वेढा पडला आहे. शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पुराच्या पाण्यात अडकलेले लहान मुले, महिला, वयोवृद्ध यांना सुरक्षित स्थळी हलविण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. बचावकार्यासाठी कोल्हापूरमध्ये नौदल आणि एनडीआरएफची पथके दाखल झाली आहेत. शहरातील वीज पुरवठा बंद आहे. इंटरनेटही बंद आहे. मोबाईल सेवा विस्कळीत झाली आहे.

पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळवण्यासाठी मोठ्य़ा अडचणींना सामोरे जावे लागते आहे. दूध, पिण्याचे पाणी, भाजीपाला यासाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत असल्याचे दिसते आहे. त्याचबरोबर पुराच्या पाण्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला दुहेरी आघाड्यांवर लढा द्यावा लागणार आहे.

येत्या 24 तासात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार; हवामान खात्याचा इशारा

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा आणि वारणा या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी कधीच ओलांडली आहे. पावसाचे प्रमाण आणि धरणातील विसर्ग यामुळे कोल्हापूर शहरातील परिस्थिती गंभीर झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांत मिळून १६ लोकांचा पुरामुळे बळी गेल्याची माहिती मिळाली आहे.