राज्यातील महायुतीत सहभागी असलेले रिपाइंचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्यावारीवर वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे १० वेळा जरी अयोध्येला गेले तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच राम मंदिराची निर्मिती होईल, असे आठवले यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंची १६ जूनला १८ खासदारांसह पुन्हा अयोध्यावारी
आठवले म्हणाले की, राम मंदिराचा मुद्दा हा सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालय जी जागा देईन ती दोन्ही पक्षांना मान्य करावी लागेल. यासाठी न्यायालयाचा निर्णय आवश्यक आहे. कायदा हातात घेऊन काही उपयोग होणार नाही. उद्धव ठाकरे १० वेळा अयोध्येला गेले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. कदाचित ते आपल्या नूतन खासदारांना अयोध्या दाखवण्यासाठी नेत असतील, असेही ते म्हणाले.
'३५० खासदार आहेत, राम मंदिरसाठी आणखी काय हवंय?'
दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या १६ जूनला अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित खासदारही असणार आहेत. हे सर्व मिळून प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या आधी अयोध्या दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शरयू नदीच्या किनाऱ्यावर आरती केली होती. त्यावेळी त्यांनी लवकरात लवकर अयोध्येत राम मंदिर उभारण्याची मागणी सरकारकडे केली होती. त्यावेळी औपचारिकपणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती जाहीर झाली नव्हती. त्यानंतर या दोन्ही पक्षांनी युती केली. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १८ उमेदवार विजयी ठरले आहेत. गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी सहकुटूंब कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळीही शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित खासदार उपस्थित होते.