पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BLOG : प्रकाश पर्व दिवाळी, समाज आणि मी

दिवाळी २०१९

सध्या देशभरामध्ये दिवाळीची धूम आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सर्वाधिक साजरा केला जाणारा हा दीपोत्सव म्हणजे एक आनंदाची पर्वणी. प्रत्येक घरातला अंधार नष्ट व्हावा. वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा  आणि एक आनंदी समाज निर्माण व्हावा  ही दिवाळीची खरी पार्श्वभूमी. पण दुसऱ्या बाजूला दोन गोष्टींचा समाज म्हणून, देश म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून सर्वांनी या प्रकाशपर्वाच्या वेळी विचार करणे क्रमप्राप्त आहे.

 गेल्या आठवड्यामध्ये दोन गोष्टी घडल्या पहिली गोष्ट म्हणजे भूक निर्देशांकामध्ये भारत सर्वाधिक उपाशी राहणाऱ्या देशांमध्ये टॉप देशांमध्ये आला. याचा अर्थ उत्पादकता असतानाही दुसऱ्या बाजूला माझ्या देशांमधील अनेक देशबांधवांना पोटभर अन्न खाता येत नाही ही एक गोष्ट ठळकपणे जगासमोर आली. खरं पाहिलं तर भारत देश हा विविध वैविध्यपूर्ण हवामान, पर्यावरण व जमीन असणारा देश आहे. वेगळ्या प्रकारचे वनस्पती, पिके या देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पिकवून हा देश एक उत्तम राहणीमानासाठीचा आदर्श देश होऊ शकतो. पण यासाठी गरज आहे समाजाच्या एकोप्याची आणि हे कसे साध्य करता येऊ शकेल याचा विचार करण्याची.

BLOG : सर्वाधिक मिस करतेय... चाळीतली दिवाळी आणि धम्माल मस्ती!

 आज अनेक गावांमध्ये एका बाजूला शेती व बारमाही पाणी उपलब्ध असणारी अनेक शेतकरी कुटुंबे तर दुसऱ्या बाजूला जमीन आहे परंतू गुंतवणूक क्षमता नसल्यामुळे फक्त पावसावर निघेल तेच पीक घेणारे कुटुंब आहे. तर शहरात एका बाजूला दररोज हॉटेलमध्ये जाऊन खाणारी कुटुंबे आणि दुसऱ्या बाजूला गावं सोडून या शहरांच्या आधारावर जगण्यासाठी येऊन एक वेळ जेवणाची भ्रांत असणारी कुटुंबे आहेत. अशी एक मोठी दरी निर्माण होऊन बसली आहे. 'आहे रे' आणि 'नाही रे' ही दरी मोठी होत असताना दुसऱ्या बाजूला आम्ही प्रकाश पर्व साजरे करत आहोत आणि ही दरी जर रुंदावली  तर सामाजिक अस्वास्थ्य मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊन या देशातली शांतता समृद्धी एकात्मता याला तडा जाऊ शकतो याची गांभीर्याने जाणीव या देशाचा एक घटक म्हणून आपल्या सर्वांमध्ये यायला लागेल. खाणारे व पिकवणारे या मधील दरी  धोकादायक दिशेने जात आहे. आपण मागच्या काही वर्षांमध्ये एका बाजूला कांद्याचे भाव वाढले म्हणून निषेध करणारी एक फळी आणि दुसऱ्या बाजूला कांद्याचे भाव कमी झाले म्हणून रस्त्यावरती कांदा ओतून समाज, सरकार यांचा निषेध करणारा शेतकरी वर्ग अशी एक दरी  आपण वारंवार पाहत आहोत. हे फक्त एक उदाहरण आहे. हे असेच घडत राहिले तर एक दिवस पिकवणारा शेतकरी पण शेती सोडून शहरांमध्ये जगण्यासाठी येईल आणि यावेळी जगण्यासाठी लागणारे धान्य कोण  पिकवणार  हा मोठा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे व्यापक नजरेने याकडे सर्वांनी पहावेच लागेल. बळीराजाचा विचार करून एक सर्वसमावेशक व्यवस्था निर्माण करण्यासाठी या समाजाचा घटक म्हणून प्रत्येकाने हातभार लावावा लागेल. पॉलिसी तयार करणाऱ्यांनी हा देश कृषिप्रधान आहे हे समजून बदल घडवून आणावे लागतील तर दुसऱ्या बाजूला या अन्नदात्याचा विचार खरेदी करणाऱ्यांनी पण करून शेतकऱ्याला त्याच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी का कू न करता त्याला योग्य भाव आपण देऊ असा  सर्वसमावेशक विचार करावा लागेल. तरच हे प्रकाशपर्व सर्व भारतीयांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रकाश घेऊन येऊ शकेल.

DIWALI 2019: ..म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे केलं जातं अभ्यंगस्नान

प्रकाश पर्व साजरे करताना दुसरा महत्वाचा विषय म्हणजे पर्यावरणाचा होणारा विध्वंस. पाठी मागील काही दिवसांमध्ये आरेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात गाजला. सर्वोच्च न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागला. झाडे जगली तरच पर्यावरण सुरक्षित राहणार आहे आणि आता फक्त चर्चा करून चालणार नाही तर प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ  येऊन ठेपली आहे. प्रदूषण इंडेक्स मध्ये  जगातल्या टॉप शहरांमध्ये या देशातील शहरे  समाविष्ट होत आहेत. हे  उद्योगांचे विषारी पाणी अनेक धरणांमध्ये आणि परत हे पाणी पिण्यासाठी शहरांपासून घरांपर्यंत आणि पिण्याच्या पाण्यापासून शेतापर्यंत पोचत आहे . यातून आरोग्याचे प्रचंड गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. गाड्यांची संख्या अमर्याद वाढल्यामुळे अनेक शहरे हे विषारी वायूंचे चेंबर  बनले आहेत आणि वायू प्रदूषणामुळे दरवर्षी विविध रोगांनी मरणाऱ्यांची, आजारी पडणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये वाढतच आहे.

 प्रकाश पर्व साजरी करताना फक्त वृक्षलागवड करून चालणार नाही तर दुसऱ्या बाजूला प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मी स्वतः काय योगदान देऊ शकतो याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करावाच लागेल. मला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा मिळण्यासाठी मी स्वतः काय योगदान देऊ शकतो हा स्वार्थ जरी समोर घेतला तरी पुरेसा आहे. जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर ,कमीत कमी प्रदूषण करणारी औद्योगिक यंत्रांचा वापर,  रसायनांचा मर्यादित वापर आणि स्वच्छतेच्या सवयी चा अंगीकार या गोष्टी स्वतः आचरणात आणल्या तर प्रदूषणाला एकाबाजूला आळा बसेल आणि दुसऱ्या बाजूला प्रदूषणामुळे अप्रत्यक्ष उद्ध्वस्त होणारे कुटुंब व्यवस्था परत सावरता येईल आणि खऱ्या अर्थाने ही दिवाळी प्रकाशपर्व म्हणून शेकडो वर्ष आम्ही साजरे करू शकू. अपारंपरिक ऊर्जास्रोत आणि स्थानिक संसाधन आधारित जीवन व्यवस्थेचा अंगीकार आपण सर्वांनी या दीपोत्सवानिमित्त करण्याची शपथ घेऊया आणि प्रदूषण मुक्त जीवन जगण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकू या. या संपूर्ण देशातील प्रत्येक नागरिकाला आनंददायी दिवाळीच्या दिशेने जाण्यासाठी प्रत्येकजण जिथे असू तिथे आणि स्वतःला जे जे शक्य आहे ते प्रयत्न करू या .चला सर्व भारतीयांची प्रकाशमय दीपावली साठी योगदान देऊया.

DIWALI 2019: म्हणून लक्ष्मी पूजनासाठी साळीच्या लाह्या आवश्यक

गोरक्षनाथ भांगे 
godsentguru@gmail. com
लेखक पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत उपजीविका क्षेत्रात कार्य करणारे अभ्यासक आहेत.