कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानंतर संपूर्ण देशभरातील मंदिरे भाविकांना दर्शनसाठी बंद करण्यात आले आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील लाखो लोकांचे दैवत असलेले पंढरपुरातील विठ्ठल-रक्मिणी मंदिरही भाविकांसाठी बंद आहे. श्री विठुरायाच्या पंढरीत भरणाऱ्या चार प्रमुख वाऱ्यांपैकी असलेली चैत्री एकादशी ४०० वर्षांच्या इतिहासात कोरोनाच्या जीवघेण्या संकटामुळे भाविकाविना पार पडली. इतकेच काय तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून दोनच दिवसांपूर्वी धुरा हाती घेतलेले गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही संत चोखोबांच्या समाधीचे दर्शन घेऊन मुंबई गाठली. परंतु, मंदिर समितीचे सदस्य तथा भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
मलेशियाला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या 'तबलिगी'च्या ८ जणांना अटक
चैत्री एकादशीनिमित्त शनिवारी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सपत्निक महापूजा केली. या पूजेनंतर अनेकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप मांडवे, सुभाष भोसले, श्रीकांत शिंदे यांनी पंढरपूर शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. शेजाऱ्याच्या उस्मानाबाद शहरातून कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. आमदार ठाकूर हे त्याच भागातून येतात. हा प्रकार अशोभनीय आहे, अशी प्रतिक्रिया संदीप मांडवे यांनी दिली आहे.
पती घानात, कोरोनाग्रस्त पत्नी ICUत, मुलाला बाधा, दिव्यांग मुलगी घरी
पंढरपूरचा श्री विठ्ठल हा गोरगरिबांचा देव आहे. तो गरीबांमध्ये रमलेला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे पंढरपूरची यात्रा भरली नाही. हजारो वारकरी दर्शनाला आले नाहीत. अशा काळात भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातून शासकीय महापूजा करण्याच्या निमित्ताने सहकुटूंब येणे चुकीचे आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. ठाकूर यांनी भान बाळगणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे यांनी दिली आहे. जिल्हाबंदी असताना पोलिसांनी ठाकूर यांना कसे काय सोडले? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
