कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी राज्यात आणखी आठ ठिकाणी नवीन लॅब सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज, मुंबईतील केईएम रुग्णालय, जेजे मेडिकल कॉलेज आणि कस्तुरबा गांधी रुग्णालयात उद्यापासून नव्या लॅबमध्ये तपासणीला सुरुवात करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय धुळे, औरंगाबाद, मिरज आणि सोलापूर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये लवकरच लॅब सुरु करणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
'वर्क फ्रॉम होम' लागू न करणाऱ्या मुंबईतील कंपन्यांवर होणार कारवाई
कोरोनाग्रस्तांचा राज्यातील वाढत्या आकड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी चर्चा झाली असून उपाययोजनेसाठी आवश्यक साधन सामूग्रीची मागणी करण्यात आली आहे, अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. केंद्र सरकार १० लाख किट्स पुरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सुरुवातीच्या काळात निर्माण झालेल्या अडचणी दूर झाल्या असून केंद्राच्या सूचनेनुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात पावले उचलली जात असल्याचेही ते म्हणाले.
परदेशात २७६ भारतीयांना कोरोनाची लागण: परराष्ट्र मंत्रालय
पुण्यातील रुग्णांसदर्भातील माहिती देताना ते म्हणाले की, सध्याच्या घडीला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात एकुण २० जणांवर उपचार सुरु असून १० जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. १० जण संशयित आहेत. पुण्यातील नायडू रुग्णालयात एकुण ३० जणांवर उपचार सुरु असून यातील ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय पुण्यातील १० खासगी रुग्णालयात विलगीकरणासाठी ४१ बेडची तर पिंपरी-चिंचवडमधील ८ खासगी रुग्णालयांना ५७ बेडची मान्यता दिली आहे.