पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना इफेक्ट : राज्यातील महाविद्यालयीन सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुका

राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले. 

उदय सामंत यांनी सोमवारी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. उदय सामंत म्हणाले, विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी सेलकडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात येईल. या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन असा अहवाल तयार करून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव आणि मंत्री यांना सादर करतील त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी संगितले.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकृषी विद्यापीठांमध्ये विविध प्रकारच्या आजारासंदर्भातील चाचण्या घेता येतील अशा स्वरूपाच्या मल्टिपर्पज लॅब सुरू करण्याच्या सूचनाही उदय सामंत यांनी दिल्या.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे अशा प्रकारची लॅब सुरू केली आहे. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या तातडीने देण्यात येतील. याच पार्श्वभूमीवर राज्यातील इतर विद्यापीठांनी आपल्याकडे अशा प्रकारच्या लॅब सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व परवानग्या देण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.