पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पश्चिम महाराष्ट्रातही भगवी लाट, काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे कडवे आव्हान

भाजप शिवसेना युतीला पुन्हा एकदा जास्त जागा मिळण्याचा अंदाज

पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा भाग आता भाजप-शिवसेनेच्या ताब्यात जात असल्याचे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून दिसून आले. जर या ठिकाणी परत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व निर्माण करायचे असेल, तर त्यांना आतापासूनच प्रयत्न करायला लागले पाहिजे. 

महाराष्ट्रात येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक होते आहे. लोकसभा निवडणुकीत या भागातील १२ जागांपैकी ९ ठिकाणी भाजप-शिवसेना युतीने यश मिळवले. तर तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसने राखल्या. मागील लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही काँग्रेसला या भागात आपले खातेही उघडता आलेले नाही. १२ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा संघनिहाय आकडेवारी बघितली तर विरोधकांसाठी परिस्थिती अजून चिंताजनक आहे. कारण या भागातील विधानसभेच्या ७२ जागांपैकी फक्त २३ ठिकाणी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना आघाडी मिळाली. 

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या भागातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने २९ जागांवर यश मिळवले होते. तर भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांनी ३७ जागांवर विजय मिळवला होता. लोकसभा निवडणुकीची आकडेवारी बघितल्यास विरोधकांसाठी परिस्थिती अजून चिंताजनक असल्याचेच दिसते.

धक्कादायक!, महाराष्ट्रातील १५ खासदारांवर गंभीर गुन्हे; चौघांची संपत्ती १०० कोटींपेक्षा जास्त!

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला ज्या मतदारसंघात यश मिळाले होते. त्याच मतदारसंघात त्यांना लोकसभा निवडणुकीला मोठी आघाडी मिळाल्याचे दिसते.  उदाहरण द्यायचे झाल्यास सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातून विजयी ठरल्या. याच मतदारसंघात येणाऱ्या बारामती विधानसभामधून त्यांना १.२७ लाख मतांची आघाडी मिळाली होती. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडून आलेले आहेत. तर शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या पुरंदर मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना अवघी ९६८१ मतांची आघाडी मिळाली. पुरंदरमधून शिवसेनेचे विजय शिवतारे निवडून आलेले आहेत. त्यामुळे तिथून त्यांना मोठी आघाडी मिळाली नाही.

सातारा लोकसभा मतदारसंघातर्गत येणाऱ्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना आघाडी मिळालेली नाही. येथून शिवसेनेच्या उमेदवाराला ४३२३ मतांची आघाडी मिळाली. वास्तविक या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडून आले आहेत. 

दुसरे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे ज्या सोलापूर मतदारसंघातून पराभूत झाले. तेथील चार विधानसभा मतदारसंघात त्यांना आघाडीच मिळाली नव्हती. सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघातून त्यांचीच कन्या प्रणिती शिंदे आमदार आहेत. पण त्यांना आपल्या वडिलांना आपल्याच मतदारसंघातून आघाडी मिळवून देता आलेली नाही.  

मिशन साऊथ!, २०२४च्या निवडणुकीत भाजपचे लक्ष्य ३३३ जागा

पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची मते ओढून नेल्याचेही आकडेवारीवरून दिसून आले आहे. 
राजकीय विश्लेषक प्रा. नितीन बिरमल म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ लहान असतात. तिथे छोटी आघाडीही परिणामकारक असते. त्याचबरोबर जे मुद्दे आता विरोधकांच्या विरोधात गेले आहेत, ते कदाचित पुढच्या काळात त्यांच्या बाजूने येऊ शकतात. जात हा घटक सुद्धा मोठा फरक घडवून आणू शकतो. त्याचबरोबर घटक पक्षांमध्ये असलेल्या मतभेदांचा लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर परिणाम झाला. तसे विधानसभेला होईलच, अशी शक्यता नाही.