गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतिपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (रविवार) अकोल्यात तर दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यातील शेतकरी संकटात सापडला असताना महायुतीचे नेते सत्ता स्थापण्यात व्यग्र असल्याची टीका करण्यात येत होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक दौरा करुन यात आघाडी घेतली होती. आता महायुतीचे नेतेही यासाठी सरसावल्याचे दिसत आहेत.
सकाळी ९.४५ वाजता मुख्यमंत्री विशेष विमानाने मुंबईहून निघतील. सकाळी १०.५५ वाजता येथे (शिवणी विमानतळ) पोहोचल्यानंतर मोटारीने म्हैसपूर फाटा येथे प्रयाण करतील. ११.२० पर्यंत तेथील पिक नुकसानाची पाहणी केल्यानंतर त्यांचा ताफा कापशी रोड व चिखलगावकडे रवाना होईल. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीच्या पाहणीनंतर दुपारी १ वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांचे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन होईल.
हे ५०-५० नवीन बिस्किट आहे का?, ओवेंसीचा उपरोधिक सवाल
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी १.३५ वाजता मुख्यमंत्री महोदय शिवणी विमानतळाकडे प्रस्थान करतील. दुपारी १.५५ वाजता मुख्यमंत्र्यांचे विमान मुंबईकडे झेपावणार आहे.
तर उद्धव ठाकरे हे सकाळी ११ वाजता कन्नड तालुक्यातील कानडगाव येथे ते भेट देऊन पाहणी करणार आहेत. दुपारी १२ वाजता वैजापूर तालुक्यातील गारज येथील शेतीची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी एक वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांकडून ते आढावा घेणार आहेत. दुपारी दोन ते तीन हा त्यांचा वेळ राखीव असणार असून, दुपारी तीन वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.