पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पूरस्थितीचे राजकारण करु नका; मुख्यमंत्र्याचे आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये महापूर आला आहे. मात्र आता हळूहळू पूराचे पाणी ओसरु लागले आहे. आज मुख्यमंत्र्यांनी सांगलीमध्ये पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, पूरस्थितीचे राजकारण करुन नका. सध्या मदतीसाठी पुढे या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

 पूरामुळे २८ हजार ५२७ कुटुंब विस्थापित

रेकॉर्डब्रेक पाऊस आणि धरणातून पाणी सोडल्यामुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली. २००५ साली पूर आला त्यावेळी ३१ दिवसांमध्ये २१७ टक्के पाऊस पडला होता. तर २०१९ मध्ये ९ दिवसात ७५८ टक्के पाऊस पडला. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूरात पूरस्थिती निर्माण झाली. सध्या पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. २८ हजार ५२७ कुटुंब पुरामुळे विस्थापित झाली. सांगली, कोल्हापूरमध्ये ३ लाख ७८ हजार लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. ३०६  छावण्यांमध्ये या लोकांना ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत १५३  कोटीची मदत देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत

एनडीआरएफ, लष्कर, नौदल आणि वायू दलाकडून बचावकार्य सुरु आहे. अनेक राज्यातून बचाव पथके दाखल झाली आहेत. ओडिशा, पंजाब, गुजरात गोवा याठिकाणावरुन मतदकार्यासाठी टीम बोलावल्या आहेत. नेव्हीच्या १५ टीम विशाखापटनम येथून येत आहेत. एकट्या सांगलीमध्ये ९५ बोटी कार्यरत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पूरामधील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत देण्यात येणार आहे. घर पडलेल्यांना १ लाख, जनावरांचा मृत्यू झाला असेल तर ३० हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. तसंच सध्या पूरग्रस्तांना काही मदत पैशांद्वारे तर काही मदत बँकेद्वारे पोहचवली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

200 डॉक्टरांच्या टीम पाठवण्यात आल्या  

तर, पूरामुळे आतापर्यंत २७ हजार ४६७ हेक्टर जमीनीचे नुकसान झाले आहे. ४८४ किमी रस्ता पावसामुळे खराब झाला आहे. महावितरणाच्या २ हजार ६१५ ट्रान्सफॉर्मर्सचे नुकसान झाले असून दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहे. तर, पूरामुळे शेतात आलेला गाळ काढण्यासाठी १३ हजार प्रतिहेक्टर तर जमीन खरडून गेली त्यासाठी ३८ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. आतापर्यंत पूरग्रस्तांसाठी ७ टन अन्नधान्य आणि पाणी देण्यात आले आहे. तसंच १०० डॉक्टरांची टीम सांगली आणि १०० डॉक्टरांच्या टीम कोल्हापूरला पाठवण्यात आल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पूरस्थितीचे राजकारण करु नका

दरम्यान, मुख्यमंत्र्यानी सर्वांना पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले आहे. ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही, सगळ्यांनी एकत्रित येऊन पूरग्रस्तांना मदत कशी करता येईल हे पाहूया असे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना आवाहन केले आहे. एखादे गावं दत्तक घेऊन कोणाला अधिकची मदत करु शकता. तसंच मदतीसाठी घरामध्ये दोन दिवस पाणी असल्याची अटक शिथिल करण्यात आली असल्याचे देखील त्यांनी सांगितले.