पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आषाढी एकादशीनिमित्त पंढपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाची शुक्रवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी पंढरपूरमध्ये लाखो वैष्णवांचा मेळा जमला आहे. गेल्या २० ते २५ दिवसांपासून राज्यातील विविध भागांतून निघालेल्या संतांच्या पालख्या गुरुवारी संध्याकाळी पंढरपुरात दाखल झाल्या. यासह अनेक वारकरी आपल्या श्रद्धेच्या स्थानी येऊन पोहोचले. चंद्रभागा स्नान, नामदेव पायरीचे दर्शन, मंदिर प्रदक्षिणा असे वारकऱ्यांचे नैमित्तिक सोपस्कार पंढरपुरात आज दिवसभर सुरू राहतील. यंदा आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात सुमारे पाच ते सात लाख भाविक जमले आहेत. 

शुक्रवारी पहाटे अडीच वाजता श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा सुरू झाली. तीन वाजेपर्यंत महापूजा सुरू होती. त्यानंतर रुख्मिणी मातेची महापूजा करण्यात आली. यंदाच्या वर्षी मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान लातूर जिल्ह्यातील विठ्ठल चव्हाण आणि त्यांच्या पत्नीला मिळाला.

बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याची मागणी आपण विठ्ठलाकडे केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र सुजलाम, सुफलाम झाला पाहिजे. बळीराजा सुखी झाला पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यंदा महापूजेसाठी येणार अशी चर्चा होती. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, माझे आणि उद्धवजींशी कायम बोलणे होत असते. ते येण्याची चर्चा केवळ माध्यमांमध्येच होती. मला त्यांनी असे काहीही सांगितले नव्हते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:chief minister devendra fadnavis perform puja of shree vitthal at pandhapur ashadhi ekadashi 2019