पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

छत्रपतींना मानाचा मुजरा! घरावरच उभारला अश्वारुढ पुतळा

घराच्या तिसऱ्या मजल्यावर अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

छत्रपती शिवाजी महाराजांवर अतोनात प्रेम करणारे अनेक मावळे महाराष्ट्रासह जगभरात आपण पाहतो. त्यांच्या प्रेमाला सीमा नसते. अशाच तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथील शिवप्रेमी शिवभक्त मुरलीधर शिवाजी शिनगारे यांनी लाखो रुपये खर्चून घराच्या तिसऱ्या मजल्यावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा दहा फूटी भव्य असा पुतळा बसवला आहे.  

मौजे केशेगाव येथील मुरलीधर शिनगारे हे इटकळ येथील राष्ट्रीय महामार्गालगत गेल्या वीस वर्षांपासून दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय करतात. हा व्यवसाय ते दोन भावांना सोबत घेऊनच करतात. अगदी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत वडिलोपार्जित पाच एकर जमीन स्वतःच्या कष्टावर व मेहनतीवर पूर्णतः बागायती करून उत्पन्न वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. दोघा भावांच्या  मदतीने दुचाकी दुरुस्तीचा व्यवसायही अगदी भरभराटीत चालतो. 

शेती उत्पन्नातून व दुचाकी दुरुस्ती व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून त्यांनी नुकतेच राहण्यासाठी घर बांधले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रचंड निष्ठा असल्याने त्यांनी घराच्या मजल्यावर महाराजांचा पुतळा बसवण्याचा संकल्प केला. पुणे येथून जवळपास अडीच लाख रुपयांचा रूबाबदार असा दहा फुट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बनवून आणला. 

क्रेनच्या सहाय्याने हा दहा फुट उंचीचा महाराजांचा पुतळा घराच्या तिसऱ्या मजल्यावर बसवण्यात आला. इटकळ व परिसरात असा भव्य महाराजांचा पुतळा प्रथमच घरावर बसवलेला आहे. त्यामुळे गाव परिसरातील नागरिक हा घरावर बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. राजेंच्या प्रेमापोटीच मी घरावरून पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिवभक्त मुरलीधर शिनगारे यांनी बोलताना सांगितले. यासाठी मला वडील व भाऊ यांनी प्रोत्साहित केल्याचे ते म्हणाले. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा
 
क्रेनच्या मदतीने तीन मजली इमारतीवर महाराजांचा पुतळा नेण्यात आला.