पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील, लोढांकडे मुंबईची जबाबदारी

चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा

रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसरीकडे त्वरीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची नूतन प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मराठवाड्यातील दानवेंऐवजी आता पश्चिम महाराष्ट्रातील चंद्रकांत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई भाजप अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांचीही नियुक्ती जाहीर करण्यात आली. विद्यमान अध्यक्ष आशिष शेलार यांची राज्यमंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे लोढा यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी निवडीची घोषणा केली.

रावसाहेब दानवे यांना मंत्रिपद दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार हे निश्चित होते. मात्र, आज अचानक दानवे यांनी दिल्लीत राजीनामा दिला आणि काही वेळातच नवीन नियुक्ती करण्यात आली. 

दानवे हे मराठा समाजातून येतात. चंद्रकांत पाटील हेही मराठा समाजाचे आहेत. पाटील हे दिल्लीतील पक्ष नेतृत्वाच्या अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. राज्य मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे मंत्री मानले जाणारे चंद्रकांत पाटील यांच्याकडे पक्षाची जबाबदारीही देण्यात आली आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्ती महत्वाची आहे. 'एक व्यक्ती एक पद' या न्यायाने राजीनामा दिल्याचे दानवे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील हेही मंत्रिपदाचा राजीनामा देतील का हे पाहावे लागेल. 

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Chandrakant Patil appointed as the President of BJP Maharashtra and Mangal Prabhat Lodha appointed President of Mumbai