पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BLOG: शेती, पर्यावरण आणि समाजाची भूमिका

शेती, पर्यावरण आणि समाजाची भूमिका

या आठवड्यातील एक बातमी होती वाढत्या महागाईमुळे कांद्यावर निर्यात करण्यास बंदी घालण्यात आली. बातमी मागील बातमी जी आहे यावर चर्चा होणे गरजेचे आहे. वारंवार ही वेळ का येते आणि जेथे शेतकऱ्याला चार पैसे जास्त मिळण्याची शक्यता असते, त्यावेळी काही निर्णय कसे घ्यावे लागतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळण्याची शक्यता कमी होते आणि दुसऱ्या बाजूला ग्राहक वर्ग खूश होतो. मध्यम मार्ग आणि शेतीमध्ये काय गोष्टी बदल होणे गरजेचे आहे यावर फारशी चर्चा होताना दिसत नाही.

BLOG : मनसे बोलेना, मनसे चालेना, मनसे फुलेना!
 
जल, जंगल आणि जमीन यांची एकात्मता आणि गुणवत्ता टिकून राहिली तर खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल होऊ शकते. शेतकरी तसेच ग्राहक हे दोन्ही समाधानी राहू शकतात. निरोगी सशक्त समाज उभा राहू शकतो. यासाठी ताबडतोब पुढील गोष्टी करणे गरजेचे आहे. समाज व्यवस्था म्हणून सर्वांनी खालील गोष्टींवर काम करणे काळाची गरज आहे. आपली सध्याची शेती पद्धती, विक्री व्यवस्थापनात तात्काळ पुढील गोष्टींमध्ये काम होणे गरजेचे आहे 

१. गुणवत्तापूर्ण बियाणे संवर्धन- पूर्वीच्या काळी शेतकरी स्वतःकडे असणारे बियाणे पिकासाठी वापरायचा. त्यामुळे बीज विकत घ्यायची गरज नसायची आणि स्थानिक जमिनीतच संवर्धन केलेले हे बियाणे असल्यामुळे त्याची गुणवत्ता आणि उगवण क्षमता ही त्या जमिनीशी जोडली गेलेली असायची. परंतु हायब्रीड बियाणे सुरु झाल्यापासून मात्र ही पारंपरिक गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध होण्याचे प्रमाण खाली आले. म्हणूनच शेतकऱ्यांचा कोट्यवधी रुपयांचा खर्च हा बाहेरील बियाणे खरेदीवर होत आहे. त्यामुळे बाजारात मिळणारा दर आणि उत्पादन खर्च याची गणिते बिघडत आहेत. शेती तोट्याची होत आहे. शासनाने या दृष्टीने विचार करून समुदाय संचालित बीजोत्पादन केंद्र सुरू करणे आणि त्यास प्रोत्साहित करणे अत्यंत गरजेचे आहे. यादृष्टीने बीज उत्पादक गावे क्लस्टर विकसित होण्याच्या दृष्टीने आणि बीज उत्पादक ग्राम व्यावसायिक उभारण्याच्या दृष्टीने काम झाल्यास बीज उपलब्धता कमी दरात होऊन एक चांगल्या प्रकारचे बियाणे स्थानिक स्तरावर उपलब्ध होऊ शकेल. तसेच त्यातून उत्पादकताही वाढवता येईल. याच सोबत शेतकऱ्यांनीही पुढे येऊन बीजोत्पादक शेतकरी म्हणून स्वतःला स्थापित करणे गरजेचे आहे.

BLOG: निवडणुकांचा काळ सुखाचा

२. पीक, जमीन व मानवी आरोग्य सुधार- प्रचंड प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत अत्यंत वेगाने कमी होत आहे. उत्पादन हे विषारी बनवून जमिनीत पाण्याच्या माध्यमातून तसेच आहारातून मानवी शरीरामध्ये जात आहेत. यातूनच आरोग्याचे प्रश्न प्रचंड गंभीर होत आहेत. अनेक ठिकाणी आपण कर्करोगाचे प्रमाण खूप वेगाने वाढल्याच्या बातम्या वाचत असतो. याचा शेती, आरोग्य, जमीन आरोग्याशी काय संबंध आहे. यावर व्यापक चर्चा होणे आणि यातून उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये जागृती होऊन आरोग्य सुधार, जमीन आरोग्य सुधार आणि पीक आरोग्य सुधारावर भर देणे गरजेचे आहे. यादृष्टीने शासनाने काही स्वागतार्ह पावले उचलली आहेत. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. दुसऱ्या बाजूला सामाजिक पातळीवर याबद्दल जास्त जागृती होणे गरजेचे आहे. 

रसायनिक खतांचा जास्त वापर करून वाढवलेल्या उत्पादनांच्या किमती कमी करून विक्री होत असल्यामुळे आणि स्वस्तातील खरेदीची मानसिकता जास्त असल्यामुळे सेंद्रिय उत्पादनांना हव्या त्या प्रमाणामध्ये सध्या मागणी दिसून येत नाही. त्यादृष्टीने व्यापक लोकजागृती होण्यासाठी शासन, स्वयंसेवी संस्था व आरोग्य क्षेत्रातील काम करणाऱ्या यंत्रणांनी सामूहिक काम करणे गरजेचे आहे. यादृष्टीने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या १५ ऑगस्टला देशाला संबोधताना शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करण्याबाबत आवाहन केलेले आहे.

३. जमीन आरोग्य-  हा एक काळजीचा विषय असून मृदेचा पोत चांगला राहण्याच्या दृष्टीने मृदेच्या पोतावर, सामूवर व्यापक जनजागृती करणे अत्यंत आवश्यक गोष्ट बनली आहे. यासाठी शास्त्रज्ञ व काम करणारी यंत्रणा आणि शेतकरी यांनी एकत्र येऊन जमिनीच्या पोत सुधारण्यावर पारंपरिक शेती पद्धतीतील अनुभव आणि त्यातून शेकडो वर्षे शेतीची गुणवत्ता कायम कशी राहिली याचा अभ्यास करून या पारंपारिक पद्धतीने परत एकदा पुनर्जीवित करुन बदल काम होणे अत्यंत गरजेचे आहे. जसे की, पारंपारिक पीक फेरपालट, आंतरपीक निवड आणि पीक लागवड पद्धती या जुन्या पद्धती जमिनीचा पोत टिकून ठेवत होत्या. त्यांना परत एकदा लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.

४. शाश्वत शेती पद्धती विकास- पूर्वीच्या काळी एकात्मिक शेती पद्धती वर शेतकऱ्यांचा जोर होता आणि ही व्यवस्था निसर्ग पूरक होती यातूनच नैसर्गिक तत्त्वांचा आधार घेत शेतीही उत्पादक आरोग्यदायी आणि एकात्मिक होती. त्यामुळे स्थानिक पातळीवर आणि स्थानिक जैव पद्धतीला अनुसरून शेती केली जात होती. त्यामुळे उत्पादन खर्च अत्यंत कमी असायचा. आता याच पद्धतीला समोर घेऊन आणि तांत्रिक उत्पादन वाढवण्याच्या पद्धती आणि जुन्या पद्धती यांची सांगड घालून शाश्वत शेती कशी करता येईल यावर लक्ष देणे गरजेचे आहे. जुन्या पद्धतींचा अभ्यास करून पीक आधारित उत्पादन पद्धतींचा सेट  बनवून तो लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात कसा पोचवता येईल यावर काम होणे गरजेचे आहे. 

BLOG : निमित्तमात्र बनलेला अर्जुन

५. पर्यावरण पूरक शेती पद्धती - अजून एक गोष्ट जी दुर्लक्षित राहिली आहे, ती म्हणजे निसर्ग आणि पर्यावरणाला पूरक शेती पद्धती. आपण सध्या पाहत आहोत कुठलेही कुठले प्रदेशांमध्ये या तत्वावर सध्या शेती उत्पादन घेणे चालू आहे आणि त्याचा तणाव पर्यावरण, मृदा यावर मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे आणि फक्त पर्यावरणीय नाहीतर सामाजिक परिणाम पण तीव्र होत आहेत. उदाहरणार्थ सध्या अत्यंत दुष्काळी भाग असणाऱ्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी घेणाऱ्या उसाचे उत्पादन घेतले जात आहे. या गोष्टींमध्ये तात्काळ बदल करणे गरजेचे आहे. पर्यावरणीय अनुकूल घटक आधारित पीक पद्धती विकासावर काम करणे गरजेचे आहे.

६. प्रती थेंब जास्त उत्पादकता - प्रति थेंब अधिक उत्पादकता ही पंतप्रधान मोदी ने केलेली घोषणा ही फक्त घोषणा न मानता आता निसर्गामध्ये जे काही भयानक बदल घडत आहेत यातून पुर दुष्काळ त्यांची तीव्रता वाढत आहे ती कमी करण्याच्या दृष्टीने आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या पाण्याच्या थेंबाला अडवून जिरवणे ही वेळेची सर्वात मोठी गरज झाली आहे. यासाठी शासनाच्या विविध योजना आणि जलसंधारणासाठी लोकांचा व्यापक सहभाग या गोष्टी एकत्रित होणे गरजेचे आहे.

BLOG : २५ वर्षांनी कसब्याचे नेतृत्त्व करणार नवा चेहरा!

वरील मुलभूत घटकावर पहिल्या टप्प्यात एकत्रित काम केल्यास कमीतकमी पर्यावरण इको सिस्टीम इंडिकेटर आपल्या बाजूने तयार होतील. मग विक्री व्यवस्थापन, आर्थिक स्त्रोत उपलब्धता, कृषी विस्तार, शेतमाल व्यवस्थापन यावर शासन आणि सामाजिक स्तरावर खऱ्या अर्थाने पूरक शासन निर्णय घेऊन आणि जनसहभाग वाढवून आरोग्यदायी पर्यावरण पूरक शेती उत्पादने खऱ्या अर्थाने लोकापर्यंत पोहोचवून दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचे उत्पादन दुप्पट करणे शक्य होईल.

गोरक्षनाथ भागवत भांगे 

(एकात्मिक शेती पद्धती अभ्यासक शेतकरी)