पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जास्तीत जास्त अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप, शिवसेनेमध्ये टस्सल

देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे

सत्तास्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा होणे अजून बाकी आहे. पण त्याआधीच जास्तीत जास्त अपक्ष आमदारांचा पाठिंबा आपल्याला मिळवण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आपले महत्त्व वाढविण्यासाठी सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. सत्तास्थापनेच्या वाटाघाटींमध्ये जास्तीत जास्त पदे आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये शिवसेनेने ५६ जागांवर विजय मिळवला. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे ६३ उमेदवार विजयी झाले होते. त्याचवेळी भाजपचे १०५ उमेदवार यशस्वी ठरले आहेत. २०१४ मध्ये हाच आकडा १२२ होता. महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्यासाठी विधानसभेत १४५ आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी या दोन्ही पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे.

दिवाळी पाडवाः वहीपूजनासाठी 'हे' आहेत शुभमुहूर्त

रविवारी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला. निवडणुकीमध्ये हा पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीकडून लढला होता. या पक्षाचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. त्यामध्ये खुद्द बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांचा समावेश आहे. दोन अपक्ष आमदारांनीही शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आशिष जैयस्वाल आणि नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेची विधानसभेतील ताकद ६० पर्यंत जाऊन पोहोचली आहे. 

दुसरीकडे भाजपने १० अपक्ष आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळेच आम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे, असे प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार पटेल यांनी सांगितले. ते म्हणाले, माझ्या मतदारसंघात किमान सुविधाही नाहीत. पण उद्धव ठाकरे यांनी त्यामध्ये लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे मी आणि बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. राजकुमार पटेल हे मेळघाट विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. ते दोन वेळा भाजपच्या तिकिटावर या मतदारसंघातून निवडून आले आहेत. पण यावेळी त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आणि ते विजयीही झाले होते.

अपक्ष आमदार आशिष जैयस्वाल म्हणाले, मी कायमच शिवसेनेचा शिवसैनिक आहे. मी तीनवेळा शिवसेनेकडून निवडून आलो आहे. त्यामुळेच मी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. निवडणुकीपूर्वी जागा वाटपात त्यांचा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला होता. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करून या मतदारसंघातून निवडणूक लढविली होती आणि ते यशस्वी झाले. 

मुंबईकर मराठी माणसाचा विश्वास शिवसेनेवर, निवडणुकीतून स्पष्ट

शिवसेनेने गेल्याच आठवड्यात सत्तेची समसमान वाटणी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्रीपदही अडीच वर्षे शिवसेनेला आणि अडीच वर्षे भाजपला दिले गेले पाहिजे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. त्यामुळे या आठवड्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये होणारी चर्चा महत्त्वाची असणार आहे.