माजी मंत्री तथा भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आपल्या बेताल वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. महिला तहसीलदारांना जाहीर सभेत त्यांनी 'हिरोइन' संबोधून नवा वाद ओढावून घेतला आहे. काऱ्हाळा गावात एका कार्यक्रमात भाषण करताना बबनराव लोणीकर यांनी यावेळी उपस्थित असलेल्या महिला तहसीलदारांचा ‘हिरोइन’ असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्याची ध्वनिफीत समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाली आहे. यापूर्वी परतूर तालुक्यातील रंगोपंत टाकळी येथील कार्यक्रमात आपल्या भाषणादरम्यान गावातील एका ग्रामस्थाला दम भरल्याची ध्वनिफीत व्हायरल झाली होती. त्यावेळी यावरुन वाद निर्माण झाला होता. विरोधकांकडून यावर टीका केली जात असून लोणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केली आहे.
आकडे दाखवून लोकांची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प: इम्तियाज जलील
काऱ्हाळा (जि. जालना, ता. परतूर) येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा शनिवारी आमदार लोणीकर यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. लोकार्पण सोहळा आटोपल्यानंतर ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांना संबोधित करताना लोणीकर बोलत होते. यावेळी त्यांची जीभ घसरली.
भारताला नवभारताकडे नेणारा सुधारणावादी अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस
ते म्हणाले की, ‘हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान पाहिजे असेल तर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा परतूरला करायचा का, तुम्ही ठरवा. सगळ्या सरपंचांनी आपापल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजेत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सगळ्यांनी ताकद जर लावली तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोर्चा होऊ शकतो आणि अधिवेशनाच्या आधी जर मोर्चा झाला तर २५ हजार लोक आले, ५० हजार लोक आले... तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीसला आणा, तुम्ही सांगा चंद्रकांत दादा पाटलाला आणा, तुम्ही सांगा सुधीरभाऊला आणा, तुम्ही सांगा कोणाला आणायचं. तुम्हाला वाटलं तर सांगा नाही तर मग एखादी हिरोनी आणायची तर हिरोनी आणा आणि नाही कोणी भेटलं तर तहसीलदार मॅडम हिरोइन आहेच. त्या निवेदन घ्यायला येतील तुमचं.’