पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निकालांनंतर भाजप पुन्हा मोठ्या भावाच्या भूमिकेत गेल्यास शिवसेनेचा स्वतंत्र बाणा!

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीची घोषणा झाली असली, तरी विधानसभा निवडणूकीपूर्वी भाजपने पुन्हा एकदा मोठ्या भावाची भूमिका निभावण्याची मागणी केल्यास आम्ही स्वतंत्रपणे लढण्यास तयार आहोत, असे संकेत शिवसेनेकडून मिळाले आहेत. भाजपला पुन्हा एकदा गेल्या विधानसभा निवडणुकीसारखीच टक्कर द्यायला शिवसेना याहीवेळी मागेपुढे पाहणार नाही. उलट गेल्यावेळेपेक्षा यावेळी आमची स्थिती चांगली असल्याचे शिवसेनेच्या एका नेत्यांने सांगितले. अर्थात हे सगळे लोकसभा निवडणुकीचे निकाल काय लागतात. यावर अवलंबून असेल. येत्या २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. 'हिंदूस्थान टाइम्स'ने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडली होती. जागा वाटपाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये एकमत होऊ शकले नव्हते. त्यानंतर भाजपने युती तोडल्याची आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची घोषणा केली. पण सध्याच्या लोकसभा निवडणूकीपूर्वी पूर्वी दोन्ही पक्षांनी पून्हा एकदा युतीची घोषणा केली. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणेच निवडणूक लढवित आहेत आणि युतीला आणखी एक संधी दिली पाहिजे. म्हणून शिवसेना पक्षप्रमुखांनी युतीला होकार दिल्याचे या नेत्याने सांगितले. लोकसभा निवडणुकीत शिवसेना २३ जागा लढवत आहे तर भाजप २५ जागा लढवत आहे. 

गेल्या विधानसभेवेळी युती होणार नाही, असे आम्हाला वाटले नव्हते. २०१४ मध्ये युती तुटल्यावर आमच्याकडे अवघे दोन आठवडेच शिल्लक होते. त्यामध्ये आम्हाला उमेदवार निश्चित करायचे होते. प्रचार करायचा होता. पण यंदा तसे नाही. आम्ही गेल्यावेळेपेक्षा जास्त तयार आहोत. 

भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करु शकणार नाही : संजय राऊत

भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा युती होताना समसमान जागा वाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. पण विधानसभेसाठी जागा वाटप नक्की कसे असेल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. जर लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षा खूपच जास्त जागा मिळाल्या, तर त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढणार हे निश्चित आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यावेळी पुन्हा एकदा भाजप मोठ्या भावाची भूमिका निभावण्याची मागणी करेल आणि विधानसभेसाठी जास्त जागा मागेल, अशी शंका शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आहे. यामुळे शिवसेनेने स्वतंत्रपणे लढण्याची तयारीही दर्शविली आहे.

पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल पण मोदी नकोः काँग्रेस

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्रात भाजपला स्वबळावर बहुमत मिळणार नाही, असे भाकीत केले होते. भाजप स्वबळावर २७२ चा आकडा पार करू शकणार नाही. त्यामुळे मित्रपक्षच पुढच्या सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतील. त्यावेळी महाराष्ट्रातून त्यांना आमचीच गरज भासेल, असे त्यांनी म्हटले होते.