पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वीरपत्नी अन् वयोवृद्धांची सेवा करणारा 'भगवान'

भगवान दाढे

अनेकांना देशसेवा, समाजसेवा करायची असते. पण त्यांना मार्ग सापडत नसतो किंवा मार्ग सापडला तरी त्यात सातत्य नसते. पण फार क्वचितच असे असतात, ज्यांना या दोन्ही गोष्टी साध्य होतात. खूप कमीजण आपल्या कार्यातून आदर्श निर्माण करताता. त्यातीलच एक सोलापूर जिल्ह्यातील भगवान मच्छिंद्र दाढे (रा. वाफळे, ता. मोहोळ). भगवान यांनी आपल्या कार्याने इतरांनाही प्रेरणा दिली आहे. भगवान हे हॉटेल व्यावसायिक आहेत. ते या  व्यवसायाच्या माध्यमातून देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नी, वीर माता-पिता यांच्या कुटुंबाना मोफत अन्नदान करतात. इतक्यावरच न थांबता ते समाजातील इतरही सधन असो अथवा निराधार ७५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना ही सेवा पुरवतात. विशेष म्हणजे भगवान हे निरक्षर आहेत. पण त्यांनी आपल्या कार्याने साक्षर व्यावसायिकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. 

सोलापूर- पुणे राष्ट्रीय महमार्गावरील वडाचीवाडी येथील हॉटेल गायत्रीचे चालक भगवान दाढे यांनी गेल्या आठवड्याभरापासून देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नी, माता पिता, तसेच समाजातील सर्व कुटुंबातील ७५ वर्षांपुढील वयोवृद्ध महिला-पुरुष यांना मोफत जेवण देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. त्यांनी तशा आशयाचे फलक आपल्या हॉटेल परिसरात लावले आहेत. पण त्यांनी फक्त फलकच लावले नाहीत तर तशी सेवा देण्यासही त्यांनी सुरुवात केली आहे. अनेकांनी याचा लाभ घेतला आहे.

'बेटी बचाव फ्री मे मंडप लगाओ' सोलापूरकराचा अनोखा उपक्रम

याबाबत भगवान दाढे म्हणाले की, मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. आमच्यावर एकेकाळी जेवताना भाकरी सोबत खायला भाजी मिळत नव्हती. आम्ही पाण्यात लिंबू व चटणी टाकून खायचो. कधी-कधी उपवास घडायचे, अन्न पाणी वेळेवर न मिळाल्यावर काय अवस्था असते हे स्वतः अनुभवल्याने इतर कोणावर अशी वेळ येवू नये म्हणून मी वयोवृद्धांसाठी हा मोफत जेवणाचा उपक्रम सुरु केला. घरातील असो अथवा बाहेरचे वयोवृद्ध नागरिक आपुलकीने सांभाळण्याचा गुण मला वडिलांकडून मिळाला आहे.

दाढे हे निराधार वयोवृद्धाना मोफत चहा-पाणी, अन्न देतातच पण हॉटेलमध्ये जेवण करायला आलेल्या सधन कुटुंबातील वयोवृद्धांचेही बिल आकारत नाहीत. केवळ त्यांचे आशीर्वाद मिळावेत हाच त्यांचा प्रामाणिक हेतू आहे. वयोवृद्धाना मोफत अन्नदान करताना द्यायचे म्हणून काही तरी अन्न ते देत नाहीत. ते म्हणतात, इतर ग्राहक जशी हवी ती ऑर्डर देवून खातात. तसेच त्यांनाही हवी असलेली भाजी, भाकरी, चपाती ते देतात.

जवान देशासाठी 'जीव' देतात तर मग मी त्यांच्या घरच्यांसाठी 'जेवण' का देऊ शकत नाही. शहीद जवानांच्या वीर माता-पिता, वीर पत्नी यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ज्या माता-पित्यांनी देशासाठी आपल्या पोटाचा गोळा बलिदान दिला. ज्या पत्नीने आपले सौभाग्य दिले. त्यांना मी पोटभर मोफत जेवण देऊ शकत नाही का? शहीद जवानांच्या बलिदानास अभिवादन व देश प्रेमापोटी त्यांनाही ही सेवा देत आहे, असे त्यांनी सांगितले.

एकीकडे समाजात आपण सुशिक्षित साक्षर मुले आपल्या आई-वडिलांना व्यवस्थित सांभाळत नसलेल्या घटना आपण ऐकतो, वाचतो. मात्र निरक्षर दाढे यांनी राबविलेला हा उपक्रम पाहता समाजात अजूनही चांगले लोक आहेत याची प्रचिती येते. 

निरक्षर असूनही सामाजिक जबाबदारीचे भान
दाढे स्वतः निरक्षर असले तरी त्यांच्यात सामाजिक जाणीव व जबाबदारी अधिक असल्याचे दिसून येते. त्यांनी त्यांच्या हॉटेलच्या नाम फलकावर मोठ्या अक्षरात मुली वाचवा, देश वाचवा, झाडे वाचवा, जीवन वाचवा असा संदेश लिहिला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bhagwan dadhe from wafale mohol dist solapur provide free meal to martyrs wife mother father and senior citizen above 75 years old