दहा दिवसांच्या पूजेनंतर लाडक्या गणरायाला गुरुवारी निरोप देण्यात आला. मात्र, बीडमध्ये गणेशोत्सवावर दुष्काळाचं विघ्न कायम होतं. दुष्काळामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना बीडकरांना करावा लागतो आहे. गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी कोरड्या पडलेल्या विहिरींमध्ये टँकरनं पाणी ओतून विहिरी भरण्यात आल्या आणि या पाण्यात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं.
पाणी टंचाईची भीषण समस्या लातूरात गणेश विसर्जन नाही, मूर्ती केल्या दान
मोमिनपुरा परिसरात असलेली विहिर आटली आहे. गणपतीच्या विसर्जनासाठी कंकाळेश्वर मंदिर परिसरातून पाणी आणून टँकरवाटे ते विहिरीत ओतण्यात आलं आणि या पाण्यात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं.

'गेल्या चार-पाच वर्षांपासून अशाच प्रकारे गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं', अशी माहिती अमर लोकरे यांनी दिली. खांदेश्वरी मंदिर परिसरात असलेली विहिरही दुष्काळामुळे कोरडी पडली होती. विसर्जनासाठी जवळपास ३० टँकरद्वारे यात पाणी भरण्यात आलं.
पुढच्या वर्षी लवकरच येणार बाप्पा!
बीडमध्ये गणेश विसर्जन केल्या जाणाऱ्या विहिरी गेल्या चार वर्षांपासून दुष्काळामुळे कोरड्या पडल्या आहेत. 'बीडमध्ये पाणी आटलं आहे. गणेश मूर्तींचं नदी किंवा तलावात विसर्जन करण्याची चैन आम्हाला न परवडणारी आहे. त्यामुळे कचऱ्यानं भरलेल्या विहिरींमध्ये आम्हाला विसर्जन करावं लागतं', अशी माहिती इथल्या स्थानिकांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना दिली.

कोरड्या विहिरींमध्ये पाणी भरलं. मात्र, प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे कप्स, फुलांच्या माळा विहिरींच्या पाण्यात तरंगत आहेत, आतमध्ये कचरा सडू लागला आहे. पाण्यास दुर्गंध येत आहे. धूपबत्त्या जाळल्या तरी पाण्याची दुर्गंधी सर्वदूर पसरत आहे. त्यामुळे विसर्जन नीट करता येत नाही, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली.