पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा २०१९: भाषणाचे फड गाजवणाऱ्या दिलीप सोपलांचे विधानसभेत मात्र मौन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेताना दिलीप सोपल

बार्शीचे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हातात शिवबंधन बांधलेले दिलीप सोपल राज्यात आपल्या वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या भाषणांनी अनेक व्यासपीठ गाजवणाऱ्या सोपल यांनी यापूर्वी मंत्रिपदही भूषवलेले आहे. विधिमंडळ कामकाजाचा प्रचंड अनुभव असलेल्या सोपल यांनी विद्यमान विधानसभेत मात्र मौन राहणेच पसंत केल्याचे दिसते. मुंबईतील संपर्क संस्थेने वर्ष २०१४ ते २०१८ या काळातल्या सर्व २८८ आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा सामजिक अंगाने अभ्यास केला आहे. यात सोपल यांनी या काळात आपल्या मतदारसंघाचा किंवा राज्याचा एकही प्रश्न उपस्थित केला नसल्याचे समोर आले आहे.

विधानसभा २०१९: पुणेकरांनो मत देण्यापूर्वी हा अहवाल नक्की वाचा

दिलीप सोपल हे २००४ सालचा अपवाद वगळता १९८५ सालापासून विधानसभेवर प्रतिनिधित्व करतात. त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. साधारणतः मागील ३० वर्षांपासून त्यांचा विधिमंडळात वावर आहे. सोपल यांनी प्रश्न जरी उपस्थित केले नसले तरी त्यांची उपस्थिती मात्र ७२ टक्के आहे.  

सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदारसंघांपैकी एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व महिला आमदार करतात. जिल्ह्यातून एकूण २५६ प्रश्न विचारले गेले. आमदार भारत भालके यांनी सर्वाधिक ६६ प्रश्न विचारले. महिलाविषयक एकमेव प्रश्न यांनीच मांडला. आमदार प्रणिती शिंदे यांची ५९ ही प्रश्नसंख्या दुसर्‍या क्रमांकावर आहे.  अक्कलकोट मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हत्रे यांच्या नावावर अवघा १ प्रश्न आहे. सिद्धाराम म्हेत्रे हेही आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. 

विधानसभा २०१९: गणपतराव देशमुख; वय ९३ वर्षे, उपस्थिती ९४ टक्के

सोलापूर शहरासह जिल्ह्यातील आमदारांची वर्ष २०१४ ते २०१८ या काळातील कामगिरी पुढीलप्रमाणे..

१. भारत भालके (काँग्रेस, पंढरपूर)- ६६ प्रश्न उपस्थित,  ८४ टक्के हजेरी

२. प्रणिती शिंदे (काँग्रेस, सोलापूर मध्य)- ६१ प्रश्न उपस्थित, ७४ टक्के हजेरी

३. हनुमंत डोळस (निधन) (राष्ट्रवादी काँग्रेस, माळशिरस)- ३६ प्रश्न उपस्थित, ८१ टक्के हजेरी

४. नारायण पाटील (शिवसेना, करमाळा)- २७ प्रश्न उपस्थित, ७१ टक्के हजेरी

५. बबनराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस, माढा)- २४ प्रश्न उपस्थित, ८७ टक्के हजेरी

६. गणपतराव देशमुख (शेकाप, सांगोला)- १६ प्रश्न उपस्थित, ९४ टक्के हजेरी

७. रमेश कदम (राष्ट्रवादी काँग्रेस, मोहोळ)- १३ प्रश्न उपस्थित, ४५ टक्के हजेरी

८. सुभाष देशमुख (सध्या कॅबिनेट मंत्री)- १२ प्रश्न उपस्थित, ८८ टक्के हजेरी

९. सिद्धाराम म्हेत्रे (काँग्रेस, अक्कलकोट)- १ प्रश्न, ६६ टक्के हजेरी

१०. दिलीप सोपल (राष्ट्रवादी काँग्रेस, बार्शी)-  ० प्रश्न, ७२ टक्के हजेरी

११. विजयकुमार देशमुख (भाजप, उत्तर सोलापूर)-  प्रश्न-उपस्थितीच्या नोंदी लागू नाहीत.