नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन शिवसेनेने लोकसभेत घेतलेली भूमिका राज्यसभेत कायम न ठेवल्यामुळे टीका होताना दिसते. दरम्यान, या विधेयकावरुन भाजप नेते तथा माजी मंत्री आशिष शेलार यांनी शिवसेनेला नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला समर्थन देण्याची मागणी केली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा हा देशहिताचा, राज्यहिताचा आहे. राज्यातील पाकिस्तानी घुसखोर हे या राज्याचे हित करु शकणार नाहीत. काँग्रेसच्या मंत्र्यांनी याला विरोध केला, हा त्यांचा उर्मटपणा आहे. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला दाद देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
देशहित महत्त्वाचे. सरकारं येतील जातील त्यामुळे सत्तेसाठी शिवसेनेने तडजोड करु नये.. मुख्यमंत्र्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करावा..यामध्ये आघाडी सोबत असेल तरीही आम्ही कायद्याच्या बाजूनेच राहू..जर आघाडी सोबत राहीली नाही तर सेनेला राजकीय सहकार्य आणि तडजोड भाजप करेल! pic.twitter.com/HR7cC2E48y
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 14, 2019
ते पुढे म्हणाले, लोकसभेत शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केले. पण राज्यसभेतून ते पळून गेले. केवळ सत्ता आणि सरकारसाठी भूमिका घेऊ नका. प्रत्येक भूमिका देश हिताच्या बाजूने नसते. देशहितासाठी भाजप तडजोड करायला तयार आहे. शिवसेनेने मूळ बाणा दाखवावा, भीतीची गरज नाही
भाजपची प्रथम राष्ट्र नंतर पक्ष नंतर मी अशी भूमिका आहे. राहुल गांधींनी टि्वट केल्यानंतर आणि काँग्रेसच्या दबावानंतर शिवसेनेने हा निर्णय घेतला. तुम्ही विधेयकाच्या समर्थनात आहात, असे आम्ही समजतो. शिवसेना कोणत्याही दबावाला झुकणारा पक्ष नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
मी मरण पत्करेल पण माफी मागणार नाही: राहुल गांधी
या विधेयकाची अंमलबजावणी महाविकास आघाडीने केली तरी आमचे त्यांना समर्थन देऊ. शिवसेनेने वेगळे होऊन जरी पाठिंबा दिला तरी आम्ही त्याला समर्थन देऊ, असेही ते म्हणाले.
काँग्रेसला त्यांची मतपेटी सांभाळायची आहे, म्हणून घुसखोर पाकिस्तानी, बांगलादेशींना बाहेर काढण्यास ते विरोध करीत आहेत. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्र धर्माचे रक्षण करावे. घुसखोर पाकिस्तानी, बांगलादेशींना काढून निर्वासित बौद्ध, जैन, ख्रिश्चन, हिंदूचे संरक्षण करा, असे टि्वटही त्यांनी केले आहे.