कोल्हापूर, सांगलीकरांची पुरामुळे मोठी हानी झाली आहे. लाखो लोकांचे संसार पाण्याखाली गेले. हजारो लोक बेघर झाले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कोल्हापूर, सांगलीकरांसाठी मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. मराठी कलाकारांनीही पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली आहे. मात्र महाराष्ट्राची जनता संकटात असताना एकाही बॉलिवूड कलाकारांनी मदत का केली नाही असा प्रश्न मनेसेने विचारला. याच पार्श्वभूमीवर 'कौन बनेगा करोडपती'च्या पत्रकार परिषदेत बच्चन यांना प्रश्न विचारण्यात आला.
कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी रितेश- जेनेलियाची २५ लाखांची मदत
चित्रपट कलाकार मदत करतात पण अनेकदा ते जाहिरात करत नाहीत मी त्यापैकी एक आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी काय मदत करता येईल यासंबधी नुकतीच माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे, असं बच्चन केबीसीच्या पत्रकार परिषदेत म्हणाले. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आणि लेखक दिलीप ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार बच्चन यांनी पूरग्रस्तांसाठी मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे, मात्र ही मदत कोणत्या स्वरूपात असणार आहे, किंवा किती निधी ते पाठवणार आहेत हे मात्र जाहीर केलेलं नाही.
त्याचप्रमाणे सोशल मीडियावरून मदतीसाठी अधिकाधिक लोकांना कसे आवाहन करता येईल यासंबधीही माझी मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाल्याचं बिग बी या परिषदेत म्हणाले.कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी केबीसी या शोमार्फतही मदत करण्याचं आवाहन करण्यात येईल असंही समजत आहे.