पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

EVM मध्ये फेरफार केला जाऊ शकत नाही, अजित पवारांचे शरद पवारांपेक्षा वेगळे मत

अजित पवार

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात EVM फेरफार केला जाऊ शकतो, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलेले असताना त्यांचेच पुतणे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ईव्हीएमवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे म्हटले आहे. जर ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकला असता, तर गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झालाच नसता, असे उदाहरणही अजित पवार यांनी दिले. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमचा मुद्दा विशेष गाजतो आहे. विरोधी पक्षांनी यासाठी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. एका मतदारसंघातील ५० टक्के मतदान यंत्रातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या दोन्हींतील मतांची फेरजुळणी करावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. एकूण २१ विरोधी पक्षांनी ही याचिका केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. वेळेचा विचार करता एका मतदारसंघातील पाचच ईव्हीएम आणि व्हीहीपॅट मशिनमधील मतांची फेरजुळणी करणे शक्य असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते. त्याला न्यायालयाने मंजुरी दिली आहे.

ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकतो, असे काही लोकांना वाटते. पण सुदृढ लोकशाहीसाठी अशी शंका घेणे योग्य नाही. माझ्या मनात ईव्हीएमबद्दल कोणतीही शंका नाही. जर त्यामध्ये फेरफार केला जाऊ शकला असता, तर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला नसता, असे अजित पवार यांनी पुण्यात म्हटले आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे मत मांडले.

पार्थ यांच्यानंतर आता रोहित पवारही निवडणुकीच्या मैदानात उतरणार

गेल्याच आठवड्यात साताऱ्यात एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकतो, असे म्हटले होते. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, मी स्वतः एकदा एका प्रेझेंटेशनमध्ये हे बघितले होते. हैदराबाद, गुजरातमध्ये काही लोकांनी ईव्हीएम माझ्यापुढे ठेवले आणि बटण दाबण्यास सांगितले. मी घड्याळाच्या चिन्हापुढील बटण दाबले. पण मत कमळाला गेले, हे मी स्वतः बघितले असल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते.

'पंतप्रधानपद स्वीकारण्यास तयार नाही असे पवार म्हणालेच नाहीत'

गेल्या २३ एप्रिल रोजी शरद पवार यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्येही त्यांनी ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकत असल्याचे म्हटले होते.