पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साईबाबांच्या जन्मस्थळाचा वादः मंदिर सुरु मात्र शिर्डीत कडकडीत बंद

साईबाबांच्या जन्मस्थळाचा वादः मंदिर सुरु मात्र शिर्डीत कडकडीत बंद

साईबाबांच्या जन्मस्थळावरुन रविवारपासून शिर्डीत बंद पुकारण्यात आला आहे. मध्यरात्रीपासूनच बंदला सुरुवात झाली. शिर्डीतील सर्व छोटे-मोठे हॉटेल्स, पुजा साहित्याची दुकाने बंद आहेत. सुटीचा दिवस असल्याने भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. अनेकांना शिर्डीत बंद आहे याची माहिती नव्हती. मंदिर परिसरातील प्रसादालयात खाण्या-पिण्याची सोय आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी बंद पुकारला असला तरी मंदिर मात्र सुरु आहे. नेहमी वर्दळ असलेल्या भागात आज शुकशुकाट दिसत आहे. 

साईबाबांच्या जन्मस्थळाच्या नामोल्लेखावरून शिर्डी ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेला समर्थन देत शिर्डी परिसरातील २५ गावांनी बेमुदत शिर्डी बंदला जाहीर पाठिंबा दिला आहे. या आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने आता जन्मस्थळाच्या उल्लेखाला होणारा विरोध आणखी तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. जोपर्यंत पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थान असा उल्लेख मागे घेतला जात नाही, तोपर्यंत शिर्डीचे आंदोलन थांबणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी येथील असल्याचा तेथील ग्रामस्थ दावा करतात. गेल्या काही वर्षांपासून हा वाद सुरु आहे. 

शिर्डी परिसरातील राहाता, अस्तगाव, पुणतांबा, डोऱ्हाळे, एकरूखे, शिंगवे, नांदुर्खी, सावळीविहीर, निघोज, निमगाव, वडझरी,पिंपळस, साकुरीसह २५ गावातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डीच्या ग्रामस्थांची भेट घेत त्यांच्या भूमिकेस पाठिंबा दिला व बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले.