बंडखोरीचा पवित्रा घेतलेले काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यातील काँग्रेसचे ८ ते १० आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर निराश असल्यामुळे हे आमदार काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले. 'एएनआय'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. दरम्यान, काँग्रेसचे विधानसभेतील माजी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभाध्यक्षांकडे सादर केला. त्यावेळी त्यांच्याबरोबर अब्दुल सत्तार हेही उपस्थितीत होते.
Abdul Sattar, expelled Congress MLA: 8 to 10 Congress MLAs are in touch with BJP. Disappointment with Congress leadership in state and their way of functioning are the reason behind our decision. State leadership is destroying the party here. pic.twitter.com/nyBX4Y9iIs
— ANI (@ANI) June 4, 2019
अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली होती. नंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु, त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला नव्हता. त्याचबरोबर त्यांनी पक्ष नेतृत्वावरही टीका केली होती. इतकेच नव्हे तर औरंगाबादमधील पक्षाच्या कार्यालयाला दिलेल्या खुर्च्याही परत घेतल्या होत्या. त्याचवेळी सत्तार हे काँग्रेस सोडतील अशी चर्चा सुरु होती.
विखेंचे कॅबिनेट मंत्रिपद जवळपास निश्चित, खाते कोणते यावरून वाटाघाटी सुरू
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या गटाचे आमदार समजले जाणारे सत्तार गेल्या काही दिवसांपासून राधाकृष्ण विखे यांच्या संपर्कात आहेत. काही दिवसांपूर्वीही त्यांनी काँग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते.