महाराष्ट्रात सामाजिक वातावरण बिघडत चालले असून अल्पसंख्यंक समाजावर ठिकठिकाणी हल्ले होत असून हे हल्ले त्वरित थांबवावे, अशी मागणी कॉंग्रेसचे माजी खासदार, माजी कामगार मंत्री हुसेन दलवाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज केली आहे. राज्यात सरकार स्थापन होऊन दिवस उलटले असून गृहमंत्री कोण याचा पत्ता नाही. मात्र ठिकठिकाणी अल्पसंख्यंक समाज आणि त्यांच्या संस्थांवर काही समाजकंटकांकडून हल्ले होत असून ते त्वरित थांबवण्याची विनंती दलवाई यांनी केली आहे.
दलवाई यांनी फेसबूकवर एक व्हिडिओ जारी केला आहे. दलवाई म्हणतात, ‘अमरावती जिल्ह्यात चांदुर बाजार येथील बेलोरा या खेडेगावात एका उर्दू शाळेवर काही हिंदुत्ववाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात शाळेतील आरसे फोडले, दगड मारले, लाकडांचे तुकडे फेकले आणि मुलांमध्ये आणि शिक्षकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम केले गेले आहे. समाजकंटकांनी शाळेच्या भिंतींवर अतिशय आक्षेपार्ह अशा घोषणा लिहिल्या आहेत. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. परंतु अदयाप काहीच कारवाई झालेली नाही.’ असं दलवाई यांनी म्हटलं आहे.
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा माजी खासदार हुसेन दलवाई यांनी निषेध केला. परंतु तेथे अल्पसंख्यंक समाजावर अत्याचार होतोय म्हणून इथल्या अल्पसंख्यंक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे चुकीचे असल्याचे दलवाई म्हणाले. कोकणात दापोली येथे दोन दिवसांपूर्वी सकल हिंदू संघटनेच्या लोकांनी मोर्चा काढून तेथे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असं दलवाई म्हणाले. तसेच एका शाळेतील मुलीवर बलात्कार झाल्याप्रकरणी कुप्रसिद्ध असलेले बदलापूरमध्ये अशाच काही हिंदुत्ववाद्यांनी मुसलमानांवर दहशत पसरवण्याचे काम करून त्यांना धंदा, व्यापार करू द्यायचा नाही अशाप्रकारे दमदाटी केल्याचे दलवाई म्हणाले. हे सगळे घडत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी महत्वाचे सांगेन कि, गृह खाते कोणाला द्यायचे हे अद्याप ठरलेले नाही आणि महाराष्ट्रात अशा प्रकारे महाराष्ट्रात दहशतवादी व हिंसावादी वातावरण निर्माण केले जात आहे. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याने हे ताबडतोब थांबवण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजेत आणि ते करा, हि माझी विनंती, असं दलवाई म्हणाले.
संबंधित बातम्या