Stone pelting on Tapti Kumbha Express in Jalgaon: जळगाव रेल्वे स्थानक येथून प्रयागराज येथे निघालेल्या ताप्ती गंगा एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. महाकुंभमेळ्यासाठी ही ट्रेन प्रयागराजला जात होती. याप्रकरणी पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. दगडफेकीमुळे या रेल्वेच्या बी-६ डब्याच्या एका खिडकीच्या काचा फुटल्या. सुदैवाने या घटनेत प्रवाशांना इजा झाली नाही.
प्रयागराज येथे कुंभमेळाव्याला सुरुवात झाली आहे. कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविक प्रयागराजला जात आहे. महाराष्ट्रातून देखील अनेक भाविक प्रयागराज येथे जात असून या साठी विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जळगाव रेल्वे पोलिसांच्या अधिकाऱ्याने रेल्वेवरील दगडफेकीबाबत अधिक माहिती दिली. सुरतहून छपराकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्स्प्रेसमधील काही प्रवाशांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून दगडफेकीची माहिती दिली. महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला निघालेल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव स्थानकातून सुटल्यानंतर दोन-तीन किलोमीटर अंतरावर गाडीवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
प्रयागराजमध्ये सोमवारी महाकुंभसुरू होत असताना ही घटना घडली. भारतीय रेल्वेने अनेक विशेष गाड्या या सोहळ्यासाठी सोडल्या आहेत. या तयारीचा आढावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी घेतला. तसेच अनेक ठिकाणी विशेष कार्यक्रम घेऊन या गाड्या प्रयागराज येथे रवाना करण्यात आल्या. येत्या ४५ दिवसांत या मेळाव्याला येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित, अखंडित आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत सेवा पुरविण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे. २४ तास कुंभमेळा वॉर रूम, आजूबाजूच्या सर्व स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे, दळणवळण यंत्रणा आणि अतिरिक्त तिकीट खिडक्या आदींची सोय रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती रेल्वे बोर्डाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
संबंधित बातम्या