जालना - जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली गावात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात हिंसाचार उफाळला होता. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी या मराठा आंदोलकांवर लाठीमार केल्याने त्या ठिकाणी तुफान दगडफेक झाली होती. यामध्ये काही महिलांसह अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. याप्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. राज्य सरकारविरोधात रोष व्यक्त केला असून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, आधी पोलिसांवर दगडफेक केल्याने लाठीमार करावा लागला. मात्र आता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय लाखे पाटील यांनी या हिंसाचारावरून संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेवर गंभीर आरोप केले आहेत.
मराठा आंदोलनात हिंसाचार करणारे संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते होते, असा गंभीर आरोप जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे. जालन्यात आज मराठा समन्वयकांची एक बैठक झाली. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप करण्यात आला. यामुळे सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करून वाद ओढवून घेणारे भिडे नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय लाखे पाटीलम्हणाले की, मराठा समाजाने आजपर्यंत शांततेत मोर्चे काढले. कधीच धुडगूस घातला नाही. मात्र मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते आंदोलनात घुसले आणि त्यांनी उद्रेक केला. त्याचबरोबर लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले, याची चौकशी झाली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे,अशी मागणीही यावेळी लाखे पाटील यांच्याकडून करण्यात आली.
संबंधित बातम्या