Shivaji Maharaj : मालवणच्या राजकोट समुद्रकिनाऱ्यावरील छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा कोसळला, शिवप्रेमींचा संताप-statue of chhatrapati shivaji maharaj at sindhudurg rajkot beach in malvan collapsed ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivaji Maharaj : मालवणच्या राजकोट समुद्रकिनाऱ्यावरील छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा कोसळला, शिवप्रेमींचा संताप

Shivaji Maharaj : मालवणच्या राजकोट समुद्रकिनाऱ्यावरील छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा कोसळला, शिवप्रेमींचा संताप

Aug 27, 2024 10:41 AM IST

Chhatrapati Shivaji maharaj Statue : मालवणच्या समुद्रकिनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी दुपारच्या सुमारास कोसळला आहे. जोरदार वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळल्याचे सांगितले जात आहे.

मालवणमधील छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा कोसळला
मालवणमधील छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा कोसळला

 

योगेश नाईक

yogesh.naik@hindustantimes.com

Chhatrapati Shivaji maharaj Statue Collapsed : मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर राजकोट किनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज (सोमवार) दुपारच्या सुमारास हा पुतळा कोसळला. शिवरायांचा पुतळा कोसळल्याने या पुतळ्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावरून शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. शिवपुतळा परिसर सुशोभीकरणासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोल तावडे यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितले की, मालवणच्या समुद्रकिनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी दुपारच्या सुमारास कोसळला आहे. जोरदार वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला. प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुतळा पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

४ डिसेंबर २०२३ रोजी सिंधुदुर्ग समुद्रकिनारी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे (Chhatrapati Shivaji Maharaj statue) अनावरण करण्यात आले होते. सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा असावा, अशी नौदलाची इच्छा होती, पण भारतीय पुरातत्व संस्थेचा याला आक्षेप होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुमारे ४३ फूट उंच आहे. जमिनी पासून बांधकाम १५ फूट तर त्यावर २८ फूट उंच हा पुतळा उभारण्यात आला होता.

राजकोट किनाऱ्यावरील शिवपुतळा परिसर सुशोभीकरण व इतर कामांसाठी सरकारने ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. राज्य सरकार आणि नौदल विभागाने पुतळा उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुतळा उभारणीचे काम जलदगतीने पूर्ण केले होते.

पंतप्रधान तसेच जनतेची उघड फसवणूक - सुप्रिया सुळे -

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल अशी जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पुर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने हि प्रधानमंत्री महोदयांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे.

दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी -

कुडाळचेआमदार वैभव नाईक यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करत म्हटले आहे की, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने एक वर्षाच्या आतच पुतळा कोसळला आहे. महाराजांचा पुतळा कोसळल्याने आम्हाला दु:ख होत असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. केवळ सहा महिन्यापूर्वीत कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला होता . ज्यावेळी काम सुरू होते त्यावेळी स्थानिक लोकांनीही कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले.

जे लोक कामाच्या दर्जाला विरोध करत होते, ते पुतळा उभारण्याच्या विरोधात असल्याचे म्हटले गेले.  ४०० वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचा एकही चिराही ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळला आहे. या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अन्यथा शिवप्रेमांकडून जिल्ह्यात नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल. तसेच सर्व शिवप्रेमींनी शांततेत आंदोलन करावे, असे आवाहनही वैभव नाईक यांनी केले आहे.