Deepak Kesarkar on Teachers recruitment : शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांसाठी राज्य सरकारनं आनंदाची बातमी दिली आहे. येत्या महिनाभरात राज्यात तब्बल ३० हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. या निर्णयामुळं सध्याच्या शिक्षकांवरील कामाचा अतिरिक्त ताणही कमी होणार आहे.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज ही माहिती दिली. नवं शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच ही भरती केली जाईल. हा भरतीचा पहिला टप्पा असेल. नवीन भरती झालेल्या शिक्षकांना त्यांच्याच गावात नियुक्ती मिळेल असं नाही. मात्र, जवळपासच्या गावात पोस्टिंग दिली जाईल. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती कधीही झालेली नाही, असं केसरकर म्हणाले.
'दुसऱ्या टप्प्यात २० हजार शिक्षकांना नियुक्ती दिली जाईल. आम्हाला ८० टक्के भरतीची परवानगी आहे. आम्ही ५० टक्के केली आहे. आधार कार्डची पडताळणी झाल्यानंतर मुलांची नेमकी संख्या कळू शकेल. त्या आधारे दुसऱ्या टप्प्यातील भरती सुरू होईल, असं केसरकर म्हणाले.
राज्यात सध्या सुमारे ४० हजार शिक्षकांची पदं रिक्त आहेत. त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे २७ हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे १३ हजार पदांचा समावेश आहे, असं शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे.
शिक्षकांच्या बदल्यांवरून देखील संभ्रम आहे. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली जाईल, असं केसरकर यांनी सांगितलं. माध्यमिक शिक्षकांप्रमाणेच प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याही रद्द करण्याबाबत चर्चा केली जाईल. जेणेकरून शिक्षकांना स्थैर्य लाभेल, असं केसरकर म्हणाले.
राज्यातील सरकारी कर्मचारी व शिक्षक जुन्या पेन्शनसाठी आग्रही आहेत. आर्थिक बाब लक्षात घेऊन राज्य सरकारनं ही मागणी अद्याप मान्य केलेली नाही. त्याचा फटका सत्ताधारी भाजप व शिंदे गटाला शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बसला होता. नव्या भरतीच्या माध्यमातून ही नाराजी दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं बोललं जातं.
संबंधित बातम्या