काश्मीरमध्ये ‘महाराष्ट्र सदन' उभारण्यासाठी अडीच एकर जागेसाठी राज्य सरकारने मोजले तब्बल ९ कोटी ३० लाख रुपये!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  काश्मीरमध्ये ‘महाराष्ट्र सदन' उभारण्यासाठी अडीच एकर जागेसाठी राज्य सरकारने मोजले तब्बल ९ कोटी ३० लाख रुपये!

काश्मीरमध्ये ‘महाराष्ट्र सदन' उभारण्यासाठी अडीच एकर जागेसाठी राज्य सरकारने मोजले तब्बल ९ कोटी ३० लाख रुपये!

Jun 21, 2024 07:55 PM IST

महाराष्ट्र शासनाच्या वतीने जम्मू काश्मीरमध्ये बांधण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र सदन'साठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांमध्ये २.५० एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे.

काश्मीरमध्ये 'महाराष्ट्र सदन' उभारणीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गवर्नर मनोज सिन्हा यांची भेट घेतली होती. (संग्रहित छायाचित्र)
काश्मीरमध्ये 'महाराष्ट्र सदन' उभारणीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गवर्नर मनोज सिन्हा यांची भेट घेतली होती. (संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र शासनाच्या वतीने जम्मू काश्मीरमध्ये लवकरच 'महाराष्ट्र सदन' उभारण्यात येणार आहे. त्यादृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने २.५० एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे. ही अडीच एकर जागा खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज पत्रकारांना दिली.

महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी जम्मू आणि काश्मिर सरकारने बडगाम जिल्ह्यातील इच्चगाम तालुक्यात २.५० एकर (२० कॅनल) जागा महाराष्ट्र सरकारला दिली आहे. जमीन खरेदीची प्रक्रिया महाराष्ट्र व जम्मू-कशिमर सरकारच्या वतीने पूर्ण झालेली आहे. महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी दोन्ही राज्यात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती रविंद्र चव्हाण यांनी दिली. जम्मू काश्मीरमध्ये राज्य सरकारचे सदन बांधणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.

जम्मू काश्मीर सरकारने दिलेल्या जमिनीवर बांधण्यात येणारे महाराष्ट्र सदन कशा स्वरुपाचे असावे, त्यामध्ये कोण-कोणत्या सोयी-सुविधा असतील याच्या नियोजन व आराखड्याची प्रक्रिया सुरु असल्याचं चव्हाण म्हणाले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष ‘महाराष्ट्र सदन’ उभारणीच्या कामाला सुरुवात होईल. त्यानंतर कश्मिरमध्ये लवकरच ‘महाराष्ट्र सदन’ उभे राहिल असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी वर्षभरापूर्वी केली होती घोषणा

जम्मू-काश्मीरमध्ये ‘महाराष्ट्र सदन’ बांधण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी केली होती. महाराष्ट्र राज्य सरकारचा प्रस्ताव घेऊन शिंदे हे ११ जून २०२३ रोजी जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गवर्नर मनोज सिन्हा यांची भेट घेतली होती. महाराष्ट्रातून जम्मू काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र सदन हे एक पर्याय असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

अयोध्येतही बांधणार महाराष्ट्र सदन

दरम्यान, जम्मू काश्मीर आणि उत्तर प्रदेशात अयोध्या या दोन ठिकाणी राज्य सरकारकडून बांधण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र सदन’ साठी राज्य सरकारने ७७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी २८ फेब्रुवारी २०२४ रोजी सादर केलेल्या राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या वेळी केली होती. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या