मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune: राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका; पुण्यात १ कोटींचा विदेशी मद्यसाठा जप्त

Pune: राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका; पुण्यात १ कोटींचा विदेशी मद्यसाठा जप्त

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Nov 24, 2022 01:10 PM IST

Pune Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे कारवाई करत तब्बल १ कोटी रुपयांचे विदेशी मद्य जप्त केले आहे.

Pune crime
Pune crime

पुणे : पुण्यात तळेगाव दाभाडे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १ कोटी रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर हॉटेल शांताई समोरील रोडवर ही कारवाई करण्यात आली आहे.

वाहन चालक प्रवीण परमेश्वर पवार (वय २४) आणि देविदास विकास भोसले (वय २९) अशी
अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ सह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चरणसिंह राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी तळेगाव दाभाडे शहराच्या हददीत, जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर, हॉटेल शांताई समोर या ठिकाणी विदेशी मद्याचा मोठा साठा येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या नुसार या ठिकाणी सापळा रचण्यात आला होता.

हा साठा गोवा राज्य निर्माती व केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी होता. एक ट्रक (क्र.एम एच ४६ AF-६१३८) हा आला असता पोलिसांनी तो थांबवला. या ट्रकची तपासणी केली असता, त्यात रिअल व्हिस्की ७५० मि.लीच्या ४ हजार १६४ सीलबंद बाटल्या, रिअल व्हिस्की १६० मि.लीच्या ५ हजार ७६० सीलबंद बाटल्या, रॉयल ब्ल्यू व्हिस्की ७५० मि.लीच्या ९ हजार ६०० सीलबंद बाटल्या असे विदेशी मद्याचे एकूण १ हजार २६७ खोके जप्त करण्यात आले. मद्य आणि वाहनासह इतर जप्त मुद्देमालाची किंमत १ कोटी ५ लाख ७ हजार ५२० रुपये इतकी आहे.

WhatsApp channel

विभाग