HSC Exam update : राज्य मंडळातर्फे घेण्यात येणारी राज्यातील बारावीची लेखी परीक्षा ही आज बुधवार पासून सुरू होत आहे. या परीक्षेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी २७१ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर अर्धा तास आधी पोहचावे असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यभरातील तब्बल १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा देण्यार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
गोसावी म्हणाले, बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या परीक्षेची जय्यत तयारी केली आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके, प्रश्नपत्रिकेची पाकिटे ताब्यात घेतल्यापासून प्रश्नपत्रिका वितरित करेपर्यंतचे चित्रीकरण मोबाईलमध्ये करण्यात येणार आहे. या सोबतच प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीवेळी जीपीएस प्रणालीचा वापर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून देण्यात आली असून या परीक्षा विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात साडेदहा वाजता, दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. यावर्षी प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल़्यमापनाचे गुण ऑनलाइन पद्धतीने भरून घेतले जाणार आहेत. तर कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या बाबतचे निर्देश जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिव्हा पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले आहेत. जिल्हा स्तरावरही भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.
यंदा १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यात कला शाखेसाठी ३ लाख ८१ हजार ९८२, वाणिज्य शाखेसाठी ३ लाख २९ हजार ९०५, विद्नान शाखेसाठी ७ लाख ६० हजार ४६, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३८ हजार २२६, आयटीआयसाठी ४ हजार ७५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
१) सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचा.
२) बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेले वेळापत्रक घेऊन जा.
३) सकाळ सत्रात स. १०.३० वाजता व दुपार सत्रात दु. २.३० वाजता परीक्षार्थ्याने परीक्षा दालनात उपस्थित रहा.
४) सकाळ सत्रात स.११.०० वाजता तसेच दुपार सत्रात दु. ३.०० वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल.
५) गतवर्षीप्रमाणेच फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेसाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेली आहे.
६) लेखी परीक्षेपूर्वी गैरमार्ग प्रकरणी विद्यार्थ्यांसमोर शिक्षा सूचीचे तसेच उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस असलेल्या सूचनांचे वाचन करा.
७) सर्व बाबी तपासल्यावर पेपर सोडवण्यास शांततेत सुरुवात करा.