HSC And SSC exam : राज्यात पुढील आठवडण्यात राज्य मंडळाच्या परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षे दरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये त्यांच्या पाण्याच्या बाटल्या हॉलमध्ये घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुण्यात जीबीएसच्या वाढत्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर, राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी फक्त पुण्यासाठी ही परवानगी दिली आहे. या बॉटल विद्यार्थ्यांना वर्गात पर्यवेक्षकाने नियुक्त केलेल्या ठिकाणी ठेवाव्या लागणार आहेत.
पुण्यात जीबीएस आजाराने थैमान घातले आहेत. पुण्यात या आजारामुळे ६ जनांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णसंख्या १७३ वर पोहोचली आहे. यामुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यात पुढील आठवड्यात बारावी आणि दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. जीबीएस आजार दूषित पाण्यामुळे पसरत असल्याचे निष्पन्न झाल्याने पुण्यातील परीक्षा देणाऱ्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. परीक्षा काळात पाण्याची बॉटल परीक्षा हॉलमध्ये नेन्यास परवानगी नसते. मात्र, पुण्यापुरता हा नियम शिथिल करण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान, मुलांना वर्गात त्यांनी घरून आणलेल्या पाण्याच्या बॉटल नेन्यास परवानगी देण्यात आली आहे.
या बाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोस्वामी म्हणाले, "सहसा, आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या बाटल्या वर्गात घेऊन जाण्याची परवानगी देत नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शाळेने आधीच केलेली असते. परीक्षेदरम्यान मुलांना तहान लागल्यावर त्यांना नेमून देण्यात आलेल्या मुलांमार्फत पाणी दिले जाते. मात्र, पुण्यात वाढत्या जीबीएस रुग्णसंख्येमुळे आम्ही तसेच पालक व विद्यार्थी धोका पत्करू इच्छित नाहीत. त्यामुळे त्यांनी घरून पाणी घेऊन यावे. हा नियम आम्ही पुण्यापुरता शिथिल केला आहे.
बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. गुरुवारी, राज्य मंडळाने ग्रेस मार्कसाठी एक परिपत्रक देखील जारी केले. त्यात म्हटले आहे की, सरकारी नियमांनुसार, फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये एसएससी आणि एचएससीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी-खेळाडू आणि एनसीसी आणि स्काउट/गाईडमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त बोनस गुण दिले जाणार आहेत.
संबंधित बातम्या