राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या(MSRTC) कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला असून कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच त्यांचा पगार मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी लागणारी रक्कम राज्य सरकारने महामंडळाकडे वर्ग केली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ३५० कोटी रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला आहे.
दिवाळी सणानिमित्त एसटी कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपयांची दिवाळीभेट देण्यात येते. यंदा ही भेट कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणीही महामंडळाने राज्य सरकारकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान होत असतो. मात्र दिवाळी पगाराच्या एक आठवडा आधीच असल्याने दिवाळीत आर्थिक खर्च, सणांसाठीची खरेदी कशी करायची असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांसमोर होता. मात्र कर्मचाऱ्यांची ही समस्या आता राज्य सरकारने दूर केली आहे. दिवाळीच्या काळात प्रवासासाठी एसटी बसचा सर्वाधिक वापर होतो. या काळात एसटीचे महसूलही वाढत असते. दरवर्षी दिवाळीच्या काळात एक महिन्यासाठी होणारी १० टक्के हंगामी भाडेवाढ यंदा रद्द केली आहे.
सणासुदीच्या गर्दीच्या हंगामात प्रवासीसंख्या वाढत असल्याने महामंडळाला चांगला महसूलही मिळतो. त्यासाठी सणासुदीला सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी महामंडळाने आधीच पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदा दिवाळी सोमवारी २८ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. तर रविवारी ३ नोव्हेंबरला भाऊबीज आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचा पगार ७ नोव्हेंबर रोजी अपेक्षित आहे. मात्र दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पगार जमा करण्याबाबत महामंडळ विचार करत आहे.
संबंधित बातम्या