गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अखेर तोडगा काढण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी ५ हजार रुपयांनी वेतनवाढीची मागणी केली असताना सरकारने मूळ वेतनात साडेसहा हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघाच्या जयश्री पाटील आदि बैठकीला उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्यात सरकारला यश आले आहे. सरकारने त्यांच्या वेतनात घसघशीत वाढ केली आहे.
बैठकीनंतरभाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मनापासून आभार मानतो. राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे. किमान त्यांच्या श्रेणीत घेऊन जायला पाहिजे. सरकाने त्यासाठी समिती नेमली होती, त्या समितीने साडेपाच हजारांची मागणी सरसकट करावी, अशी सूचना केली होती. आमची मागणी पाच हजार रुपये वेतन वाढवण्याची मागणी केली होती. सरकारने आमची मागणी मान्य केली. ज्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये अडीच हजार, चार हजार आणि पाच हजार अशी सरसकट वाढ केली होती. त्या कर्मचाऱ्यांना सरसकट साडेसहा हजार रुपयांची वेतनात मिळणार आहे.
सरकारच्या निर्णयानुसार २०२१ मध्ये ज्यांना ५ हजार रुपयांची वाढ झाली होती. त्यांच्या पगारात आता दीड हजाराची वाढ होणार आहे. तर ज्यांना दीड हजाराची वाढ झाली होती त्यांना ५ हजारांची पगारवाढ तर ज्यांना अडीच हजारांची वाढ दिली होती त्यांच्या पगारात ४ हजार रुपयांची घसघशीत वाढ सरकारने केली आहे. सरकारसोबत बैठक यशस्वी झाल्याने उद्यापासून सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर रुजू व्हावे, असे आवाहन पडळकरांनी केले आहे. त्यामुळे दोन दिवसापासून थांबलेल्या लालपरीची चाके धावण्याची शक्यता आहे.