ST bus strike : एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे. खेड, दापोली, तसेच मुंबई सेंट्रल येथून जाणाऱ्या एसटीबस रद्द झाल्याने कोकणात गावी जाणाऱ्यांची गैरसोय झाली आहे. ज्या प्रवाशांनी एसटीच्या भरवशावर गणेशोत्सवासाठी गावाला जायचं नियोजन केलं होतं त्याच एसटीनं दगा दिल्याने आता गाव गाठायचे कसे? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाण्यासाठी अनेकांनी एसटीबसचे आरक्षण करून ठेवले होते. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्याने या प्रवाशांची गैरसोय झाली आहे. मंगळवारी आणि बुधवारी मुंबई सेन्ट्रलमध्ये कोकणात जाणाऱ्या व आरक्षण केलेल्या प्रवाशांनी आगार वाहतूक नियंत्रण कक्षासमोर गोळका घालत त्यांना जाब विचारला. स्थानकावर असलेल्या कामगारांची देखील गडबड झाली आहे. त्यामुळे आता प्रवाशांनी गावी जाण्याचे इतर मार्ग सोडण्यास सुरुवात केली आहे.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कोकणातील दापोली, खेड एसटी आगारांच्या कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला हे. मुंबई सेंट्रल आगारातून कोकणात जाणाऱ्या गाड्यांवर या संपाचा सर्वाधिक फटका बसला आहे. एसटी बसेस आगारात न आल्याने कोकणात नियोजित असलेल्या एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटी तर्फे जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. या गाड्यांचे अनेकांनी आरक्षण देखील केले होते. या गाड्या ४, ५ आणि ६ सप्टेंबर रोजी सोडल्या जाणार आहे. मात्र, हे आंदोलन सुरूच राहिल्यास घरी जायचे कसे हा प्रश्न प्रवाशांना पडणार आहे. मुंबई सेंट्रल एसटी आगारात बसेस नसल्याने मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे. अनेक प्रवासी या स्थानकात अडकून पडले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे बस वाहतुकीवर परिणाम झाला आहे. एसटी कर्मचारी संपामुळे सोलापूर विभागात मराठवाड्यातून मुक्कामी येणाऱ्या बहुतांश गाड्या या आल्या नाहीत. त्यामुळे आज बुधवारी या संपाचा परिमाण जाणवू लागला हे. गाड्या नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. नागपूरमध्येही हीच स्थिती आहे. लातूरमध्ये देखील काही कर्मचारी या संपात सहभागी झाले आहे. त्यामुळे येथील प्रवाशांची गैरसोय झाली आहे.