एमएमआरटीएने १ फेब्रुवारीपासून मुंबई आणि लगतच्या महानगर प्रदेशातील रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या मूळ भाड्यात ३ रुपयांची वाढ करण्यास मान्यता दिली आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, रिक्षांचे नवे मूळ भाडे २३ रुपयांऐवजी २६ रुपये असेल, तर पिवळ्या-काळ्या टॅक्सीचे मूळ भाडे सध्याच्या २८ रुपयांवरून ३१ रुपये करण्यात आले आहे.
ब्लू आणि सिल्व्हर कलरच्या एसी कॅबचे भाडे पहिल्या दीड किलोमीटरसाठी ४० रुपयांऐवजी ४८ रुपयांपासून सुरू होणार आहे. गुरुवारी झालेल्या एमएमआरटीएच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. हे नवीन दर १ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होतील. यापूर्वी, शेवटची भाडेवाढ ऑक्टोबर २०२२ मध्ये करण्यात आली होती.
ऑटो रिक्षा : पहिल्या १.५ किलोमीटरसाठी आता २३ रुपयांऐवजी २६ रुपये द्यावे लागतील.
काळी-पिवळी टॅक्सी : पहिल्या १.५ किमीसाठी २८ रुपयांऐवजी ३१ रुपये द्यावे लागतील.
निळ्या आणि सिल्वर एसी कूल कॅब: पहिल्या १.५ किमीचे भाडे ४० रुपयांऐवजी ४८ रुपये असेल.
वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,बेस्ट आणि नवी मुंबई परिवहन सेवेतील वाढत्या स्पर्धेमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यांच्या एसी बस सेवांचे किमान भाडे अनुक्रमे ६ रुपये आणि १० रुपये आहे,ज्यामुळे ऑटो आणि टॅक्सी चालकांचे नुकसान होत होते.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने २४ आणि २५ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बस भाड्यात १४.९५ टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे.
गुरुवारी झालेल्या महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र मोटार वाहन विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक वाहतूकदारांपैकी एक असून दररोज १५ हजार बस फेऱ्यांमधून ५५ लाख प्रवासी प्रवास करतात.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती. गुरुवारी नवीन भाडेवाढ मंजूर केलेली आहे. त्यानंतर १ फेब्रुवारीपासून टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार आहे. एसटीची भाडेवाढ दर वर्षाला करणं गरजेचं आहे. एसटी प्रशासनाला दर दिवशी ३कोटीचा तोटा सहन करावा लागत असून यानुसार महिन्याला ९०कोटींचा भुर्दंड महामंडळाला सोसावा लागत आहे. तसेच टॅक्सी आणि रिक्षाचे तीन रुपये प्रति किलो मीटर भाडेवाढ होणार आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.
संबंधित बातम्या