- मुंबई महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागात सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या ५० वर्षांचे रामप्पा दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC Result) जाहीर झाला. यंदा राज्याचा निकाल ९६ टक्क्यांच्या वर लागला आहे. यामध्ये अनेक प्रौढांनी परीक्षा दिल्याची उदाहरणेही समोर आली आहेत. यातलचे एक आहेत बीएमसीमध्ये सफाई कामगार असलेले कुंचिकोरवे माशन्ना रामप्पा. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी दहावीची परीक्षा दिली आणि उत्तीर्णही झाले. शिकण्याची इच्छा असलेल्या रामप्पा यांनी तीन वर्षांपासून अभ्यास सुरू केला होता. लहानपणी शिक्षण अर्धवट राहिलेलं ते पूर्ण करण्याचा निश्चय त्यांनी केला होता. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांना राज्य माध्यमिक बोर्डाची परीक्षा दिली आणि पासही झाले.
ट्रेंडिंग न्यूज
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात रामप्पा काम करतात. बी वॉर्डमध्ये काम करणाऱ्या रामप्पा यांनी तीन वर्षांपूर्वी तयारी सुरू केली होती. त्यांनी ८ वी साठी धारावीच्या युनिव्हर्सल नाइट स्कूलमध्ये दाखला घेतला होता. बीएमसीत काम करणारे रामप्पा पहिल्याच प्रयत्नात दहावीची परीक्षा पास झाले आहेत. त्यांना ५७ टक्के मिळाले असून १२ वीची परीक्षा देण्याचीही त्यांची इच्छा आहे.
दहावीची परीक्षा देण्याच्या रामप्पांच्या निर्णयामागे एक खास कारणसुद्धा आहे. ज्या ज्या वेळी त्यांना मिळणाऱ्या वेतनाबाबत ते बीएमसी अधिकाऱ्यांकडे जायचे तेव्हा शिक्षण घेतल्यावर सगळं मिळेल असं ऐकां लागायचं. अधिकाऱ्यांचं हे बोलणं मनाला लागल्यावर त्यांनी शाळा शिकायचा निर्णय घेतला. दिवसभराच्या कामानंतर सायंकाळी सात ते साडे आठ वाजेपर्यंत ते शाळेत जायचे. जवळपास २० वर्षांपासून रामप्पा बीएमसीमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत आहेत.
रामप्पा म्हणाले की, "मला ५७ टक्के गुण मिळालेत. दररोज ३ तास अभ्यास केला. माझी मुलं पदवीधर आहेत, त्यांनीही मला अभ्यासात मदत केली. मला शिक्षण सुरू ठेवायचं आणि १२ वी पूर्ण करायची इच्छा आहे. लहानपणी शिक्षण अर्धवट राहिलं, पण आता दहावीची परीक्षा पास झाल्याचा आनंद आहे. पुढेही शिकायचे असून इतरांनाही प्रेरणा द्यायची असल्याचं ते म्हणाले.
संबंधित बातम्या