Maharashtra Board 10th SSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं आपला निकाल पाहता येणार आहे, तसेच गुणपत्रिका डाऊनलोड करून घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येतील.
यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१०टक्के लागला असून यंदाही कोकण विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. कोकण विभागाचा ९९.८२ टक्के एवढा निकाल लागला आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर विभाग असून दहावीच्या निकालात नागपूर तळाला राहिला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली असून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९६.१४ तर मुलांची टक्केवारी ९२.२१अशी आहे.
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
यंदा दहावीच्या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १५,४६,५७९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. त्यातील १४,५५,४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.
राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४,८८,७४५ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ४,९७,२७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३,६०,६३० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, १,०८,७८१ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
दहावीच्या बोर्ड परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ९,६७३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,५८५ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी ८,८४४ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतची टक्केवारी ९२.२७ आहे.
कोकण : ९९.८२ टक्के
कोल्हापूर : ९६.७८ टक्के
मुंबई : ९५.८४ टक्के
पुणे : ९४.८१ टक्के
छत्रपती संभाजीनगर : ९२.८२ टक्के
अमरावती : ९२.९५ टक्के
नाशिक : ९३.०४ टक्के
लातूर : ९२.७७ टक्के
नागपूर : ९०.७८ टक्के
एकूण ६२ विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी एकूण २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन साठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार असून यासाठी https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर सर्व माहिती देण्यात आली आहे.
गुणपडताळणीसाठी अर्ज करावयाची मुदत उद्या बुधवार १४ मे ते २८ मे पर्यंत आहे. यासाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. गुणपडताळणीसाठी प्रति विषय ५०/- रुपये इतके शुल्क ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागेल.
संबंधित बातम्या