SSC Exam 2024: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती, आवेदनपत्रे भरण्याच्या तारखेत बदल!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  SSC Exam 2024: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती, आवेदनपत्रे भरण्याच्या तारखेत बदल!

SSC Exam 2024: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती, आवेदनपत्रे भरण्याच्या तारखेत बदल!

Nov 04, 2024 04:54 PM IST

Class 10th Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या आवेदनपत्रे भरण्याच्या तारखेत बदल केला आहे.

इयत्ता दहावीच्या आवेदनपत्रे भरण्याच्या तारखेत बदल
इयत्ता दहावीच्या आवेदनपत्रे भरण्याच्या तारखेत बदल (HT_PRINT)

maharashtra board 10 class News: इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली. विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत दिनांक ०५/११/२०२४ पर्यंत भरायची होती. मात्र, आता आवेदनपत्रे भरण्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, इयत्ता दहावीच्या नियमित शुल्क आवेदन पत्रात मुदतवाढ करण्यात आली. त्यानुसार, विद्यार्थी ०६ नोव्हेंबर २०२४ ते १९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान नियमित शुल्क आवेदन पत्र भरू शकतात. तर, विलंब शुल्क आवेदन पत्राची तारीख २० नोव्हेंबर २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४ अशी करण्यात आली. सर्व माध्यमिक शाळांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी आपल्या स्कूल प्रोफाइलमध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे.

सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरण्याच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांच्या लॉगिनमधून प्री-लीस्ट उपलब्ध करुन दिली जाईल. माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत मुख्याध्यापक यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.

इयत्ता दहावी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांनी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे -

१) सर्व माध्यमिक शाळांनी वेबसाइटद्वारे प्राप्त ऑनलाइन चलनावर नमूद केलेल्या आयसीआयसी बँकेच्या व्हर्च्युअल अकाऊंटमध्ये कोणत्याही बँकेमधून आरटीजीएस/एनईएफटीद्वारे चलनाप्रमाणे अचूक शुल्क रकमेचा भरणा करण्यात यावा, चलनाची प्रत व प्री- लीस्ट विहित मुदतीमध्ये विभागीय मंडळास जमा करावी.

२) यापूर्वी वापरात असणाऱ्या बँक ऑफ इंडिया/ एचडीएफसी बँक/ अॅक्सेस बँकच्या जुन्या चलनांचा वापर करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे मंडळात रोख स्वरूपात शुल्क स्विकारले जाणार नाही.

३) माध्यमिक शाळांनी सादर केलेली सर्व आवेदनपत्रांने विहीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत.

४) विलंब शुल्काने आवेदनपत्रे सादर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात येणार नाही. याची सर्व संबंधितांनी नोंद घेण्यात यावी.

५) अतिविलंब शुल्काने आवेदनपत्रे भरण्याच्या तारखा यथावकाश कळविण्यात येतील.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर