Speeding Truck Overturns On Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर भरधाव ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. हा अपघात १७ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून ट्रक चालकाला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले आहे. मात्र, या थरारक अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओत अपघातग्रस्त ट्रक एका पुलावरून जाताना दिसत आहे. मात्र, वळण घेताना ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक पलटी झाला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोरघाटातील अमृतांजन पुलावर हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने, ट्रकचालक या अपघातातून थोडक्यात बचावला. ही घटना दोन दिवसांपूर्वीची असल्याची सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारवर आदळल्याची घटना घडली. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, सहा जण जखमी झाले होते.
कसारा घाटात दुधाचा टँकर दरीत कोसळून झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ठाणे ग्रामीण पोलिसांनी सोमवारी उघडकीस आणली. भरधाव वेगाने येणारा टँकर लोखंडी बॅरिअरवर आदळून २०० फूट खोल दरीत कोसळला. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी टँकरचालकावर भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती शहापूरचे एसडीपीओ मिलिंद शिंदे यांनी दिली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले आणि चार ही जखमी मुंबई गाठण्यासाठी टँकरमध्ये बसून प्रवास करत होते. पाच वर्षांच्या मुलासह जखमींना गोटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात विजय घुगे (वय ६०,), आरती जायभावे (वय, ३१), सार्थक वाघ (वय, २०), चालक योगेश आढाव (वय, ५०) आणि रामदास दराडे (वय, ५०) अशी या अपघात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर, अक्षय घुगे (वय, ३०), श्लोक जायभावे (वय, ५), अनिकेत वाघ (वय, २१) असे जखमींचे नावे आहेत. जखमींवर कसारा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.