Mumbai Accident News: पुणे, नागपूर कार अपघाताचे प्रकरण ताजे असताना मुंबईच्या सायन रुग्णालय परिसरात भरधाव कारच्या धडकेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. मृत महिलेची अद्याप पोलिसांना ओळख पटली नसल्याने पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरु आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोकमान्य टिळक म्यूनसिपल रुग्णालय (सायन रुग्णालय) परिसरात शुक्रवारी रात्री हा अपघात घडला. रुग्णालय परिसरात एका भरधाव कारने दिलेल्या धडकेत संबंधित महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार, हा अपघात सायन रुग्णालयाच्या परिसरात झाला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
झोन ४ चे डिसीपी प्रशांत कदम म्हणाले, २४ मे रोजी आम्हाला माहिती मिळाली की एक ज्येष्ठ नागरिक महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. तिच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा होत्या. आम्ही तिच्या जखमांची पडताळणी केली तेव्हा, अपघात झाल्यासारखे वाटले. तपासात असे आढळून आले की, डॉक्टरांनी चालविलेल्या काळ्या रंगाच्या कारने तिला धडक दिल्याने ती जखमी झाली आहे, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पुण्यातील पोर्शे कारच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील माझगाव परिसरात २३ मे रोजी भरधाव दुचाकीच्या घटनेत एका ३२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्या, त्यांना उपचारासाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर जेजे मार्ग पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३०४ (२) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम ३,४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात रविवारी (१९ मे २०२४) बिल्डरच्या एका १७ वर्षांच्या मुलाने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन अभियंत्यांना त्याच्या पोर्श कारने चिरडले. कार चालवणारा अल्पवयीन दारूच्या नशेत होता. या भीषण रस्ता अपघातात दोन्ही अभियंत्यांचा मृत्यू झाला. अनिश अवधिया (वय, २४) आणि अश्विनी कोष्टा (वय,२४) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी असून पुण्यात कामाला होते. वेदांत अग्रवाल असे आरोपी अल्पवयीन मुलाचे नाव आहे. या प्रकरणानंतर वाद चांगलाच वाढला. या मुद्द्यावरून राजकीय पक्षांमध्येही जोरदार चर्चा सुरू होती.
संबंधित बातम्या